केस पकडून युवतीचा विनयभंग, मैत्रीणीलाही दिली जीवे मारण्याची धमकी दिली
By दयानंद पाईकराव | Updated: August 16, 2023 14:38 IST2023-08-16T14:36:35+5:302023-08-16T14:38:16+5:30
प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

केस पकडून युवतीचा विनयभंग, मैत्रीणीलाही दिली जीवे मारण्याची धमकी दिली
नागपूर : एकतर्फी प्रेमातून युवतीचे केस पकडून तिच्या मनाला लज्जा होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग करून आरोपीने युवतीच्या मैत्रीणीला हिला माझ्याकडे पाठव नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी दिली. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
हिमांशु रविशंकर चंद्राकार (वय २८, रा. प्रतापनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या आणि बीसीएला शिकत असलेल्या एका युवतीशी त्याची ओळख होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. परंतु तो वारंवार फोन करीत असल्यामुळे युवतीने त्याचा मोबाईल ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे आरोपी हिमांशुला तिचा राग आला. त्यानंतर युवती आपल्या दोन मैत्रीणींसोबत आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी हिमांशु तेथे आला. तुझ्याशी बोलायचे आहे बाजुला चल असे तो युवतीला म्हणाला. परंतु युवतीने विरोध केल्यामुळे आरोपीने तिचे केस पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
त्यानंतर युवतीच्या मैत्रीणीकडे पाहून तुझ्या मैत्रीणीला माझ्याकडे पाठव नाहीतर तुला जिवानिशी ठार मारेन, अशी धमकी दिली. युवतीचे वडिल तेथे पोहोचल्यामुळे आरोपी तेथून पळून गेला. युवतीच्या तक्रारीवरून प्रतापनगर ठाण्याचे उपनिरीक्षक सतिश भोले यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (अ) (२), ३५४ (ड), ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.