Nagpur: कंत्राटदारांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु झाले का? कर्जबाजारी झालेल्या कंत्राटदाराची आत्महत्या; अभिनेता प्रभासशी कनेक्शन
By योगेश पांडे | Updated: September 1, 2025 20:39 IST2025-09-01T20:38:07+5:302025-09-01T20:39:52+5:30
Nagpur PV Verma Death: अभिनेता प्रभासचा मेहुणा होता कंत्राटदार : सुमारे ४० कोटींची होती थकबाकी

Has the season of contractor suicides begun? Suicide of a contractor who was in debt
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कंत्राटदाराने कर्जबाजारीपणाच्या तणावातून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कंत्राटदार वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. ४० कोटींहून अधिकचे सरकारी बिल थकल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात येत आहे. पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (६१) असे संबंधित कंत्राटदाराचे नाव असून ते अभिनेता प्रभास याचे मेहुणे होते. राज्यातील कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला असून यातून अनेक जण नैराश्यात जात असून या घटनेमुळे सरकारी कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वर्मा हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार होते. श्री साई असोसिएट्स नावाची त्यांची फर्मच्या माध्यमातून ते कंत्राट घेत होते. त्यांचे काम नागपूरसह गोंदिया व विदर्भातील विविध जिल्ह्यांत सुरू होते. नागपूर मनपाच्या हॉटमिक्स प्लान्टची कामेदेखील ते घेत होते. कोट्यवधींची देयके थकीत होते. त्यामुळे ते आर्थिक संकटांचा सामना करत होते. त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन थकीत देयके लवकरात लवकर अदा करण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र त्यात यश आले नव्हते. त्यामुळे ते तणावात होते.
वर्मा हे काही काळापासून राजनगर येथील फ्लॅटमध्ये एकटे रहायचे तर त्यांचे कुटुंबिय हैदराबादमध्ये रहायचे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आर्थिक संकटांमुळे त्रस्त होऊन वर्मा यांनी घरीच गळफास घेतला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास वर्मा यांचा मित्र महेश बियाणी त्यांना भेटण्यासाठी फ्लॅटवर आला. बराच वेळ कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सुरक्षारक्षकाला विचारणा केली. सुरक्षारक्षकाने वर्मा यांच्या मोलकरणीला फोन केला. तिच्याकडे फ्लॅटची चावी होती. जेव्हा ती आली आणि फ्लॅटमध्ये गेली तेव्हा वर्मा लटकलेल्या अवस्थेत आढळले. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक वर्मा यांच्या घरी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, वर्मा यांच्या कुटुंबियांनादेखील या प्रकाराची माहिती देण्यात आली. सर्व जण नागपुरसाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. इंजिनिअर असलेला मुलगा एका खाजगी कंपनीत आहे, तर मुलगी डॉक्टर आहे. मुन्ना वर्मा यांचे अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी मानकापूर घाटावर केले जातील अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
आर्थिक संकटांमुळे झाले होते ‘ब्लॉक’
वर्मा यांनी लोकांना पैसे देण्यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले होते. हप्ते न भरल्यामुळे बँकाकडूनदेखील दबाव येत होता. वर्मा यांनी आर्थिक कोंडीतूनच टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मात्र वर्मा यांनी मोबाईलमध्ये कर्जबाजारीपणातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी अपार्टमेंटचे सीसीटीव्ही देखील तपासले. त्यात वर्मा यांच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीची हालचाल दिसली नाही.
प्रभासचे मेहुणे, १९६२ पासून नागपुरात वास्तव्य
वर्मा हे उच्चभ्रू कुटुंबाशी संबंधित होते व प्रसिद्ध चित्रपट अभिनेता प्रभास याचे ते मेहुणे होते. प्रभास हा त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा मामेभाऊ आहे. वर्मा यांचे आजोबा १९६२ मध्ये व्यवसायासाठी अविभाजित आंध्र प्रदेश राज्यातून रामटेकला आले होते. त्यानंतर ते येथे स्थायिक झाले. वर्मा काही दिवसांपूर्वी हैदराबादलाही गेले होते व तेथे प्रभासचीदेखील भेट झाली होती.
कंत्राटदार संघटनेमध्ये संताप
राज्यातील अनेक कंत्राटदारांची देयके थकलेली आहेत. त्यावरून सातत्याने आंदोलनेदेखील सुरू आहेत. बरोबर एक महिन्यापूर्वी जलजीवन मिशनचे सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनीदेखील आत्महत्या केली होती. गणेशोत्सवानंतर आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यासाठी बैठक घेतली जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केले. तर शेतकऱ्यांनंतर आता कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची पाळी आहे. सरकारने प्रथम थकीत देयक अदा करावे व नंतर नवीन काम सुरू करावे अशी भूमिका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी मांडली.