लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडबी चौकात एका व्यापाऱ्यावर भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला व त्याच्याजवळील जवळपास ५० लाखांची रक्कम लुटून पळ काढला. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे.
संबंधित रक्कम हवालाशी निगडित असल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून 'ऑल इज वेल'चे दावे करण्यात येत असले तरी शहरात गुंडांची हिंमत वाढत असल्याचेच चित्र आहे. राजू दीपानी (जरीपटका) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू
या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तातडीने संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या भागातील निवासस्थानांमधील सीसीटीव्हीचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे. दिपानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
बराच वेळेपासून पाठलागाची शक्यता
- संबंधित आरोपी दीपानी यांचा बराच वेळेपासून पाठलाग करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- त्यांनी दीपानी मुख्य रस्त्यापासून आत शिरल्यानंतर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- हा प्रकार व्यापारातील वर्चस्वातून झाला आहे का तसेच संबंधित रक्कम हवालाशी निगडित होती का या दिशेनेदेखील शोध सुरू आहे.
- दीपानी यांनी अगोदर बॅगेत दोन लाख असल्याचे सांगितले. मग आकडा पाच लाखांवर गेला. त्यानंतर ५० लाखांची बाब समोर आली.
- त्यांनी नेमके किती पैसे होते हे सांगण्यात लपवाछपवी केल्याने तो पैसे हवालाशी निगडित असल्याचा पोलिसांचा संशय आणखी बळावला.