इतवारीत भांडे व्यावसायिकावर जीएसटीची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:31 IST2019-09-21T00:30:43+5:302019-09-21T00:31:30+5:30
इतवारी तीननल चौकातील होलसेल भांडे बाजारात जीएसटी विभागाच्या पुणे येथील चमूने एका मोठ्या भांडे व्यावसायिकावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उजेडात आणले आहे.

इतवारीत भांडे व्यावसायिकावर जीएसटीची धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी तीननल चौकातील होलसेल भांडे बाजारात जीएसटी विभागाच्या पुणे येथील चमूने एका मोठ्या भांडे व्यावसायिकावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उजेडात आणले आहे. गुरुवारी सुरू झालेली कारवाई शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटीची एक चमू पुणे येथून गुरुवारी सकाळी नागपुरात आली. या चमने दुपारी या मोठ्या व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली. अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून जवळपास ५० लाख रुपये आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. चमूला आतापर्यंतच्या तपासणीत जवळपास एक कोटीपेक्षा जास्त रुपयांची करचोरी केल्याचा संशय आहे. चमूने व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना भांडे व्यवसायसंदर्भात विचारपूस केली. या व्यापाऱ्याचा भांडे बाजारात मोठा व्यवसाय असून होलसेल विक्रेता म्हणून परिचित आहे. हा व्यापारी हवालाचा व्यवसाय करीत असल्याचा जीएसटीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. यामुळे या प्रकरणी अधिकारी अधिक गांभीर्याने तपास करीत आहे. हा व्यापारी यापूर्वीही आर्थिक एजन्सीच्या रडारवर होता. त्यांच्याकडे चोरीची एक मोठी घटना घडली आहे.
या कारवाईने भांडे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इतवारी भांडे बाजार विदर्भात सर्वात मोठा आहे. विशेष प्रकारच्या भांड्याच्या व्यवसायात या व्यापाऱ्याचे वर्चस्व आहे. पुढील काही दिवसात अन्य भांडे व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची चर्चा आहे.