‘दिव्यांग म्हणजे पूर्वजन्माचे पाप’ या मानसिकतेतून बाहेर पडा - रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:20 PM2023-04-10T12:20:11+5:302023-04-10T12:21:14+5:30

दिव्यांग मुलांचे सर्वसमावेशक केंद्र ‘इन्सपायर’चे उद्घाटन

grow out of the mindset that 'disability is a sin of previous birth' - Ram Nath Kovind | ‘दिव्यांग म्हणजे पूर्वजन्माचे पाप’ या मानसिकतेतून बाहेर पडा - रामनाथ कोविंद

‘दिव्यांग म्हणजे पूर्वजन्माचे पाप’ या मानसिकतेतून बाहेर पडा - रामनाथ कोविंद

googlenewsNext

नागपूर : पूर्वजन्मात केलेले पाप दुसऱ्या जन्मात दिव्यांगाचा रूपाने येते, अशी मानसिकता आजही कायम आहे. यातून बाहेर पडल्यावरच आपण ‘इन्सपायर’सारख्या संस्थेतून दिव्यांग मुलांवर उपचार, शिक्षण व त्यांना त्यांच्या पायावर उभे करू शकू, असा विश्वास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे दिला.

हिंगणा रोड जुनापाणी येथील दिव्यांग मुलांच्या सर्वसमावेशक केंद्र ‘इन्सपायर’चे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर ‘इन्स्पायर’चे संचालक व बाल ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विराज शिंगाडे, संस्थेचे विश्वस्त रत्नादेवी शिंगाडे, दादाराव वानखेडे व उपाध्यक्ष डॉ. रश्मी शिंगाडे उपस्थित होते. यावेळी ‘इन्स्पायर’ या संस्थेला मदत करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी खा.डॉ. विकास महात्मे, दिल्ली पब्लिक लायब्ररी बोर्डचे चेअरमन सुभाष कनखेरीया, डी.एस. विरय्या व व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे उपस्थित होते. संचालन शुभांगी रायलू, प्रास्ताविक डॉ. विराज शिंगाडे यांनी केले, तर आभार डॉ. रश्मी शिंगाडे यांनी मानले.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान व चिल्ड्रेन केअर इन्स्टिट्यूटकडून मागील १६ वर्षांपासून दिली जात असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. ‘इन्सपायर’चे कार्य नावासारखेच प्रेरणा देणारे आहे. जन्मत: दोष असणाऱ्या किंवा अपघाताने दिव्यांगता आलेल्या मुलांचे पुनर्वसन करणे हे देवाचे कार्य असल्यासारखेच आहे. सामाजिक कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे. प्रत्येक नागरिकाने आपले सामाजिक दायित्व पूर्ण करणे आवश्यक आहे. यातूनच देशाच्या विकासात मोठी झेप घेता येईल.

‘इन्स्पायर’ची जबाबदारी प्रत्येकाची

दिव्यांग व्यक्तींचे दु:ख दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांची घोषणा केली. त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणा असेही सुचविले. दिव्यांगांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जशी ‘इन्स्पायर’ने जबाबदारी घेतली तशी प्रत्येकाने घ्यावी. तरच दिव्यांग विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा संदेश दिला आहे. त्याच धर्तीवर ‘इन्स्पायर’ काम करीत आहे, असेही माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

Web Title: grow out of the mindset that 'disability is a sin of previous birth' - Ram Nath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.