गोवऱ्यांनी होणार अंत्यसंस्कार
By Admin | Updated: April 29, 2015 02:44 IST2015-04-29T02:44:32+5:302015-04-29T02:44:32+5:30
शहरातील विविध स्मशानघाटांवर अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

गोवऱ्यांनी होणार अंत्यसंस्कार
नागपूर : शहरातील विविध स्मशानघाटांवर अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊन अंत्यसंस्कारांसाठी गोवऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शहरातील तीन घाटांवर गोवरी दहन पिंजरे बसविण्यात आले आहेत.
‘एका पार्थिवासाठी किमान एक वृक्ष’ असे समीकरण आहे. हेच वृक्ष वाढविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लाकडांनीच अंत्यसंस्कार व्हावेत, असे बंधन कुठल्याही धर्मात नसल्याचा दावा करीत नागपुरातील ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला. गोवऱ्यांचा वापर केल्यामुळे पर्यावरण प्रदूषण होत नाही.
त्यामुळे शहरातील तीन घाटांवर गोवरी दहन पिंजरे बसविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडे संस्थेकडून परवानगी मागण्यात आली. महानगरपालिकेनेदेखील ही परवानगी दिली व संस्थेने सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे पिंजरे स्मशानघाटांवर लावले.
मोक्षधाम घाट येथे दोन, सहकारनगर व अंबाझरी घाट येथे प्रत्येकी एक असे चार पिंजरे लावण्यात आले आहेत. घाटांवर महानगरपालिकेतर्फे गोवऱ्या पुरविण्यात येतील.(प्रतिनिधी)