अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी, घेतले चांदीचे दागिने, १५ लाख रोख; तरीही पत्नीचा हुंड्यासाठी छळ
By योगेश पांडे | Updated: September 24, 2025 16:01 IST2025-09-24T15:56:40+5:302025-09-24T16:01:30+5:30
अमेरिकेतील छळवणुकीचा नागपुरात गुन्हा : पतीकडून मारहाण झाल्याचादेखील आरोप

Got a high paying job in America, took silver jewelry, 15 lakhs in cash; still harassed wife for dowry
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील अनेक लोक उच्चशिक्षित झाले असले तरी त्यांच्या डोक्यात हुंड्याची कीड मात्र कायमच असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणाने कुटुंबीयांच्या नादी लागून नागपूरकर पत्नीचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ केला. इतकेच नव्हे तर तिला अमेरिकेतील घरातून हाकलण्यात आले.
तिच्यासमोर नागपुरात माहेरला परत येण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. या प्रकरणात नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती व त्याचे आई-वडील हे मूळचे रायगडमधील कळंबोलीतील रहिवासी आहेत.
मूळची नागपूरकर असलेल्या महिलेचे डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. तिचा पती अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत काम करतो. लग्नात तिच्या वडिलांनी १० लाख रोख, दागिने तसेच महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर महिला पतीसोबत रायगडला गेली व तेथून केवळ १० दिवसांतच पती एकटाच अमेरिकेला गेला. मात्र, त्यानंतर सासू, सासऱ्यांनी तिचा छळ सुरू केला. लग्नात फारच कमी हुंडा दिला असल्याचे टोमणे तिला मारले जायचे. या छळवणुकीमुळे ती तणावात गेली होती व तिने पालकांना प्रकार कळविला होता. तिच्या वडिलांनी पै पै जोडून तिच्या सासू, सासऱ्यांना चांदीच्या दागिन्यांचा सेट व १५ लाख रुपये रोख दिले. इतके होऊनदेखील अमेरिकेतून तिचा पती माझ्या वडिलांचा तुझ्या माहेरचे लोक आदर करत नाही असे म्हणायचा. ऑगस्ट २०२२ मध्ये तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तर पती व सासूसासऱ्यांनी हद्दच केली. वडिलांची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर कर नाही तर इथे राहू नको असे म्हटले.
सासरचे म्हणायचे, तू गवार, भिकाऱ्याची पोरगी
२०२२ मध्येच ती सासू, सासऱ्यांसह अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गेली. तेथे पती व सासू, सासरे तिला तू फक्त पदवी शिकली असून गवार आहेस. तुझ्या वडिलांनी काहीच पैसे दिले नाही व तू भिकाऱ्याची मुलगी आहेस असे म्हणून छळायचे. तिथे ओळखीचे कुणीच नसल्याने ती प्रचंड तणावात गेली होती.
अमेरिकेतून हाकलले, पत्तादेखील बदलला
पती व ती अमेरिकेत राहत असताना पतीने तिला अनेकदा मारहाण केली व प्रॉपर्टी हवीच असा दबाव टाकू लागला. क्षुल्लक कारणावरून तो तिला अमानवीय पद्धतीने मारहाण करायचा. तिला त्याने भारतात सासरी पाठविले. मात्र, सासू, सासऱ्यांनी तिला माहेरी हाकलले. जून २०२५ मध्ये ती स्वतः तिकीट काढून अमेरिकेत पोहोचली. मात्र, पतीने तिला न सांगता घरच बदलले होते. अमेरिकेत कुणीच नसल्याने व तो फोनच उचलत नसल्याने अखेर तिला तसेच परतावे लागले. तेव्हापासून ती माहेरीच राहते आहे. तिच्या तक्रारीवरून पती व सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.