नागपुरात अंधाऱ्या ठिकाणी प्रियकरासोबत बसलेल्या मुलीवर गुंडाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:02 IST2018-11-03T20:13:34+5:302018-11-03T23:02:55+5:30
निर्जन अंधाऱ्या ठिकाणी बसलेल्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावल्यानंतर एका आरोपीने प्रेयसीवर बलात्कार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध करून दोन्ही आरोपींना अटक केली.

नागपुरात अंधाऱ्या ठिकाणी प्रियकरासोबत बसलेल्या मुलीवर गुंडाचा बलात्कार
नागपूर : निर्जन अंधाऱ्या ठिकाणी बसलेल्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावल्यानंतर एका आरोपीने प्रेयसीवर बलात्कार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध करून दोन्ही आरोपींना अटक केली.
पीडित तरुणी १९ वर्षांची असून ती बी.कॉम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिच्याच वर्गात शिकणाऱ्या समवयस्क तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध आहे. हे दोघे शुक्रवारी हैदराबाद-जबलपूर महामार्गावर फिरायला गेले होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यापासून ५० मिटर आतमध्ये एक ले-आऊट आहे. तेथे हे दोघे गप्पा करीत बसले. रात्री १०.४५ च्या सुमारास दोन आरोपी तेथे आले. त्यांनी एवढ्या रात्री निर्जन ठिकाणी अंधारात तुम्ही काय करीत आहा, अशी विचारणा करून त्यांना धाकदपट सुरू केली. एकाने तरुणाला मारहाण करीत रस्त्याला पळवून लावले. तर, दुसऱ्या एका आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. यानंतर आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.
दरम्यान, प्रेयसीला दुसरा आरोपी ओढून नेत असल्याचे पाहून प्रियकराला संभाव्य धोक्याची कल्पना आली. त्यामुळे तो धावत पळत रस्त्यालगतच्या एका ढाब्यावर आला. त्याने ढाब्यावर हजर असलेल्यांना या प्रकरणाची माहिती देऊन मदतीची याचना केली. तसेच पोलिसांनाही मदतीसाठी फोन केला. ढाब्यावरील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, ते तेथे पोहचण्यापूर्वीच पीडित तरुणी रस्त्याकडे चालत येताना दिसली. तिने आपल्या प्रियकराला घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांचे गस्तीवरील पथक तेथे पोहचले. त्या भागात आरोपींची बरीच शोधाशोध करूनही ते सापडले नाही. त्यामुळे पीडित तरुणी तिच्या प्रियकरासह हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. तेथे तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक पुरभे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती कळताच शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली.
हुडकेश्वर पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथकही आरोपींची शोधाशोध करू लागले. आज सकाळी गुन्हे शाखेचे एक पथक खरसोली गावात आरोपींना शोधत असताना पीडित तरुणीने सांगितलेल्या वर्णनाचा एक व्यक्ती पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याने आपले नाव अनिल वसंता थेटे (वय ४३) सांगून रात्री केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बाबा रामदास भगत (वय ३७) नामक आरोपीचेही नाव सांगितले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणले. तेथे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींची चौकशी करून सायंकाळी या दोघांना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.
यापूर्वीही केले अनेक गुन्हे
आरोपी वसंता थेटे आणि बाबा भगतने ज्या पद्धतीने हा गुन्हा केला, त्यावरून हे दोघे अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराईत असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. अनेक प्रेमीयुगुल दिवस मावळताच रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जातात. त्यांच्यावर थेटे-भगत सारखे आरोपी पाळत ठेवतात. प्रेमीयुगुलांनी आक्षेपार्ह कृत्याला सुरुवात करताच आरोपी तेथे जातात आणि अत्याचार करतात. बदनामीच्या धाकाने जोडपे पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. त्यामुळे आरोपींचे फावते. तीन वर्षांपूर्वी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात अफरोज टोळीनेही अशाच प्रकारे प्रियकराला मारहाण करून पळवून लावले होते. तर प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केला होता. गेल्या आठवड्यातच या प्रकरणाचा निकाल लागला असून, आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, हे विशेष!