प्रवाशांसाठी गूड न्यूज... पुणे नागपूर वंदे भारत लवकरच होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:47 IST2025-05-05T15:40:51+5:302025-05-05T15:47:59+5:30
रेल्वेमंत्र्यांकडून संकेत : प्रवाशांना मोठा दिलासा

Good news for passengers... Pune Nagpur Vande Bharat will start soon
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वर्षातील बाराही महिने प्रचंड गर्दी असल्याने मिळेल ते तिकीट घेऊन नागपूर-पुणे- नागपूर असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गूड न्यूज आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ही जलद गती ट्रेन सुरू केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीच तसे संकेत दिले आहेत.
हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस गाड्यांचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसांपूर्वी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
वैष्णव यांचे हे वक्तव्य नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठे दिलासादायक आहे. कारण नागपूर-पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रोजची संख्या हजारोंच्या घरात आहे. १४ ते १६ तासांचा हा प्रवास करण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे या मार्गावर वर्षातील ३६५ ही दिवस मोठी गर्दी असते. परिणामी अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळतच नाही. जे मिळाले ते तिकीट घेऊन प्रवासी रेल्वेत चढतात. अनेक जण खासगी बसचा पर्याय निवहतात. मात्र, बसने एवळा लांबचा प्रवास करताना प्रवाशांची कंबरमोड होते. प्रवास भाडेही जास्त जाते आणि अनेक कारणांमुळे बसचा प्रवास कंटाळवाणा ठरतो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात यावी, अशी सुमारे दोन वर्षापासूनची प्रवाशांची मागणी होती. त्या संबंधाने प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून तसे निवेदनही रेल्वे मंत्रालय, रेल्वे प्रशासनाकडे गेले होते. मात्र, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा अधिकार सर्वस्वी रेल्वे मंत्रालयाचा असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांकडून हतबलता व्यक्त होत होती. आम्हालाही ही गाडी सुरू व्हावी, असे मनोमन वाटत असल्याची प्रतिक्रिया अधिकारी खासगीत व्यक्त करीत होते. या पार्श्वभूमीवर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची चर्चा झाल्याचे आणि सर्व काही सकारात्मक असल्याचे पुढे आल्याने नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहे.
नागपूरहून धावणारी चौथी वंदे भारत
सर्व प्रथम अडीच वर्षांपूर्वी नागपूर-जबलपूर-नागपूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर दूसरी वंदे भारत नागपूर उज्जैन इंदोर ही सुरू झाली. नंतर ध्यानीमनी नसताना गेल्यावर्षी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. आता नागपूर-पुणे-नागपूर सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस ठरणार आहे. ती लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
मोठा प्रतिसाद मिळणार
गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेली नागपूर-सिकंदराबाद ही २२ कोचची वंदे भारत एक्स्प्रेस अनेक महिने रिकामी ठणठण धावत होती. त्यामुळे रेल्वेला चांगलाच आर्थिक फटका बसला. तोटा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीचे आठ कोच कमी केले. तरीसुद्धा तिला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद नाही. याउलट नागपूर-पुणे-नागपूर तंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास ही गाडी वर्षभर प्रवाशांनी भरभरून धावणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांना तर फायदा होईलच मात्र, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्नाच्या रूपाने मोठा फायदा मिळणार आहे.