नागपुरात जीएसटीसह सोने एक लाख रुपयांवर! एप्रिलमध्ये ५,४०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 21, 2025 18:54 IST2025-04-21T18:40:20+5:302025-04-21T18:54:55+5:30
Nagpur : सोने आणि चांदीचे दर कमी होतील तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला

Gold worth Rs 99,704 including GST in Nagpur! Increase of Rs 5,400 in April
नागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येत आहे. सोमवार, २१ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ९७,२०० रुपयांवर पोहोचले. सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह लाख रुपयांवर विकल्या गेले. सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत २४ कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल ५,८०० रुपयांची वाढ झाली. त्या तुलनेत चांदी प्रतिकिलो ३,८०० रुपयांनी उतरली. शनिवारच्या ९५,८०० रुपयांच्या तुलनेत सोने १,४०० हजारांनी वाढून ९७,२०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीही १,३०० हजारांनी वाढून ९६,३०० रुपयांच्या तुलनेत भाव ९७,६०० रुपयांवर पोहोचली.
यावर्षी मिळाला २० टक्के परतावा
ट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असे तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला. यावर्षी १ जानेवारीला ७६,९०० रुपयांवर असलेल्या शुद्ध सोन्याचे भाव २१ एप्रिलपर्यंत ९७,२०० रुपयांपर्यंत वाढले. या दिवसात २०,३०० रुपयांची वाढ अर्थात ग्राहकांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची खरेदी वाढल्याचे जीजेसी आणि नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले.
सोने-चांदीचे भाव :
दिनांक सोन्याचे भाव चांदीचे भाव
१ एप्रिल ९१,४०० १,०१,४००
५ एप्रिल ८९,१०० ८९,०००
१० एप्रिल ९१,९०० ९२,३००
१५ एप्रिल ९३,४०० ९५,८००
१६ एप्रिल ९५,१०० ९७,८००
१७ एप्रिल ९५,३०० ९६,३००
१८ एप्रिल ९५,९०० ९६,३००
१९ एप्रिल ९५,८०० ९६,३००
२१ एप्रिल ९७,२०० ९७,६००
(३ टक्के जीएसटी वेगळा)