लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीसह सोन्याच्या दरात तब्बल ७,४४३ ची वाढ झाली आहे. सोमवारी एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ६०० ची उसळी नोंदवली गेली. नागपुरात सोमवारी ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोने १,११,३४३ रुपयांत विकल्या गेले.
लग्नसमारंभासाठी खरेदी करणाऱ्यांचे बजेट वाढणार
ही उसळी पाहता ग्राहकांमध्ये मोठी खळबळ माजली असून, सर्रास खरेदी करणाऱ्यांचे बजेट विस्कटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर सतत वाढत असून, रोजच्या व्यवहारांवर याचा परिणाम दिसून येतो आहे. लग्नसराई आणि नवरात्र, दसरा, दिवाळी सारख्या मोठ्या सणासुदीच्या खरेदीत ग्राहकांना जास्त किंमतींचा सामना करावा लागणार आहे. शिवाय लग्नसमारंभासाठी खरेदी करणाऱ्या कुटुंबांचे बजेट वाढणार आहे. जागतिक बाजारातील आर्थिक अनिश्चितता, डॉलरच्या मूल्यातील चढउतार, गुंतवणूकदारांचा वाढता कल, या कारणांमुळे सोन्याचा दर उंचावत असल्याचे विश्लेषकांचे मत आहें.
गुंतवणूकदारांसाठी ही वाढ दीर्घकालीन संधी ठरू शकते, तर सामान्य खरेदीदारांसाठी मात्र सोन्याची खरेदी हा ‘महागडा सौदा’ ठरणार आहे.
८ सप्टेंबरला सोन्याचे दर (कॅरेटनुसार)
- २४ कॅरेट १,११,३४३ रुपये
- २२ कॅरेट १,०३,५१५ रुपये
- १८ कॅरेट ८६,७२९ रुपये
- १४ कॅरेट ७२,४०९ रुपये
(३ टक्के जीएसटीसह)