जनरेशन झेडचा संताप, सोशल मीडियाविना श्वास घेता येतो का?
By राजेश शेगोकार | Updated: September 15, 2025 15:38 IST2025-09-15T15:37:10+5:302025-09-15T15:38:31+5:30
Nagpur : सोशल मीडियावर बंदी म्हणजे नळाला कुलूप लावून पाणी थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न. लोक तहानलेलेच राहतात आणि तहान वाढली की तोडफोड करून नळ फोडतात. बंदी ही समस्या सोडवत नाही; ती समस्या अधिक तीव्र करते. भविष्यातील धोका याच ठिकाणी दडलेला आहे.

Generation Z's anger, can they breathe without social media?
राजेश शेगोकार
नागपूर :नेपाळमध्येसोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय झाला आणि काही क्षणांतच तरुणाईच्या शिरांत जणू बारूद पेटले. संसद जळाली, राष्ट्रपती भवन जळाले, न्यायालय जळाले आणि अखेरीस पंतप्रधानांची खुर्चीही राख झाली. हा केवळ एक राजकीय प्रसंग नव्हता; ही होती एका पिढीची हतबल किंकाळी.
जनरेशन झेड म्हणजे ज्यांचा जन्मच इंटरनेटच्या प्रकाशात झाला. ज्यांनी बालपणात हातात खेळणी कमी आणि मोबाइल स्क्रीन जास्त पाहिले. ज्यांनी पहिले शब्द उच्चारले तो यूट्यूबवरचा गाणं ऐकून, ज्यांनी पहिले मित्र मिळवले ते फेसबुक-इन्स्टाग्रामवर, ज्यांची पहिली ओळख झाली ती स्वतःच्या प्रोफाइल पिक्चरवर. अशी पिढी अचानक सोशल मीडियाशिवाय ठेवली, अशा पिढीला अचानक 'तुमचे जग बंद' असे सांगितले, तर ते जणू माशाला पाण्याबाहेर टाकल्यासारखे आहे. ते तडफडणारच, ती पिढी कशी शांत बसणार? त्यांच्या दृष्टीने सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही; तो त्यांचा श्वास आहे, ओळख आहे, स्वतःला व्यक्त करण्याची एकमेव खिडकी आहे.
पण या मानसिकतेचे दोन टोक आहेत. एका बाजूला आपल्या भावी पिढीचे आयुष्य केवळ डिजिटल जगावर उभे राहणार का? हा मोठा प्रश्न आहे. लाइक्स म्हणजे प्रेम, फॉलोअर्स म्हणजे सन्मान आणि बंदी म्हणजे अस्तित्व हरवणे, हे समीकरण कितपत टिकाऊ आहे? एका कुटुंबात जेवताना चार जण टेबलाभोवती बसतात; पण प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. समोर बसलेला मुलगा बापाशी बोलत नाही; पण पाचशे किलोमीटर दूरच्या मित्राशी मेसेजिंग करतो. ही मानसिकता अधिक प्रबळ होत असल्याची आजची वस्तुस्थिती आहे.
दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामुळे त्यांना जागतिक दृष्टिकोन, ज्ञान आणि नव्या संधी उपलब्ध होत आहेत. छोट्या खेड्यातला युवक आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले कौशल्य दाखवून जगभरात पोहोचू शकतो. सामाजिक न्याय, पर्यावरण, लैंगिक समानता अशा विषयांवर आवाज उठवण्यात जनरेशन झेड पुढे आहे. जनरेशन झेडची ताकद नाकारता येणार नाही; पण हीच ऊर्जा जर संतापाच्या ज्वालामुखीतून बाहेर पडली, तर ती फक्त उजेड देणार नाही तर राखही करून टाकेल हा इशाराही जगाला मिळाला आहे.
जर ही पिढी केवळ डिजिटल अस्तित्वाशी बांधली गेली, तर वास्तवातील आव्हानांचा सामना करण्याची त्यांची क्षमता कमी होईल. आंदोलन करणे, तोडफोड करणे किंवा सत्ता उलथून टाकणे हे उपाय नाहीत.
त्याऐवजी सोशल मीडियाचे महत्त्व नाकारता कामा नये; पण त्याचा उपयोग सकारात्मक, सर्जनशील आणि लोकशाही बळकट करणाऱ्या मार्गाने व्हावा याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच गरज आहे संवादाची.
सत्ताधीशांनी तरुणाईला शत्रू न मानता भागीदार मानले पाहिजे. आभासी जग आणि वास्तव जग यांच्यामध्ये पूल बांधणे आवश्यक आहे. कारण ही पिढी बदल घडवणारी आहे प्रश्न इतकाच आहे की तो बदल रचनात्मक असेल का विध्वंसक ?