काश्मीर-छत्तीसगडसह देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी
By योगेश पांडे | Updated: November 24, 2025 20:32 IST2025-11-24T20:30:58+5:302025-11-24T20:32:09+5:30
सुनिल आंबेकर : संयुक्त राष्ट्र, डब्लूएचओ शोषण दूर करण्यात अपयशी

'Gen-Z' in the country including Kashmir-Chhattisgarh wants peace, not chaos
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांगलादेश, नेपाळमधील ‘जेन-झी’चे आंदोलन हा तेथील संवैधानिक समस्येंतून निर्माण झालेला मुद्दा होता. भारतातील ही पिढी अराजकतावादी नसून महत्वाकांक्षी आहे. काही देशविरोधी तत्व देशातील ‘जेन-झी’ला भडकविण्याचे षडयंत्र करत आहेत. मात्र काश्मीर असो किंवा छत्तीसगड, देशातील ‘जेन झी’ला शांती हवी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपुरात आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवादरम्यान ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’दरम्यान ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात लेखक निखील चंदवानी यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या देशात वेगवेगळ्या टप्प्यांत तरुणांनीच आंदोलने केली व आणीबाणी असो किंवा २०११ सालचे राजधानीतील आंदोलन, त्याची धुरा तरुणांनीच उचलली होती. तरुणांमध्ये देशभक्तीचा भाव वाढला आहे. त्यांना भारतमातेचा जयजयकार करणे किंवा वंदे मातरम म्हणणे ‘कूल’ वाटते. त्यांना देशाचा गर्व वाटतो व ते विकासाच्या गोष्टी करतात, असे आंबेकर म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तिनिर्माण व त्यातून समाज घडविण्याचे काम करत आहे. २०४७ पर्यंत भारताबाबत जगातील अराजकतावादी देशांमध्ये सात्विक भय राहिले पाहिजे. भांडवलशाहीच्या विळख्यातून जगाला मुक्त करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना भांडवलशाहीचे शोषण दूर करण्यात अपयशी ठरले आहे. भारतातूनदेखील ज्यावेळी वसाहतवादी मानसिकता दूर होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याप्राप्तीला अर्थ येईल, असे आंबेकर म्हणाले.
एकटेपणा ही नवीन पिढीमधील समस्या
एकल कुटुंबपद्धतीमुळे एकटेपणा ही नवीन पिढीमधील समस्या बनते आहे. त्यातूनच ‘फोमो’सारखे मुद्दे समोर येतात. मात्र हा एकटेपणा कुटुंबातूनच दूर होऊ शकतो. त्यासाठी कुटुंबासोबत समाजासोबत जिव्हाळा वाढणे आवश्यक आहे. संघ त्यादृष्टीनेच कार्य करत आहे. असे सुनिल आंबेकर म्हणाले.