गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध
By नरेश डोंगरे | Updated: August 7, 2025 20:07 IST2025-08-07T20:03:51+5:302025-08-07T20:07:31+5:30
रॅक्स, मॅक्स, सिकंदर, योद्धाकडून तस्करांची दाणादाण : रेल्वे सुरक्षा यंत्रणांत ठरले ‘द रियल हिरो’

Ganja smugglers' shattered! Accurate target of 'narcos team' on the railway
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रॅक्स, मॅक्स, लुसी, सिकंदर, योद्धा ही नावे सध्या रेल्वेतील सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. ‘ऑपरेशन नार्कोस’मध्ये ते सलग बजावत असलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे रेल्वेतून गांजा तस्करी करणारांची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. त्याचमुळे सुरक्षा यंत्रणांत ही नावे 'रियल हिरो'सारखी लोकप्रिय झाली आहेत.
ओडिशातील संभलपूरनजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात गांजा पिकविला जातो. अत्यंत स्वस्त दरात तो उपलब्ध असल्याने आणि ओडिशा, पश्चिम बंगाल या दोन प्रांतात तो पकडला जाणार नाही, अशी गांजा माफियांकडून हमी मिळत असल्याने ठिकठिकाणचे तस्कर तेथून गांजा खरेदी करतात. तो रेल्वे गाड्याने नागपुरात येतो. येथून महाराष्ट्रासह छत्तीसगड, एमपी, कर्नाटक, यूपी, दिल्लीमध्ये पाठविला जातो. गेल्या काहीर वर्षांत गांजा तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते लक्षात घेऊन रेल्वेच्या तपास यंत्रणांनी ‘ऑपरेशन नार्कोस’ सुरू केले. यात नमूद पाच श्वान अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. स्थानकांवरील अडगळीची जागा असो की प्रवाशांना बसण्यासाठी लावलेले बेंच. ट्रेनमधील वरचा असो की खालचा बर्थ कोणत्याही ठिकाणी पडून असलेली बॅग. ‘नार्कोस’चे हिरो अचूक वेध घेतात. विशिष्ट गंध-सुगंध येताच ते आपल्या हॅण्डलरला संकेत देतात अन् गांजा तस्करीचा डाव उधळून लावतात. ऑपरेशन नार्कोसच्या माध्यमातून तस्करांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या श्वानांमधील रॅक्स, मॅक्स आणि लुसी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) तर, सिकंदर आणि योद्धा रेल्वे पोलीस (जीआरपी)मध्ये कार्यरत आहेत.
दीड वर्षांत २५ कारवाया; ४६१ किलो गांजा जप्त
या श्वानांनी २०२४ मध्ये १५ रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये ३९३ किलो गांजा तर, यावर्षी गेल्या सहा महिन्यात १० वेगवेगळ्या ठिकाणी ६८ किलो गांजा पकडून दिला आहे. सोबत २७ गांजा तस्करही पकडले गेले आहेत.
मोडस ऑपरेंडी बदलली : सुरक्षा आयुक्त
गांजा तस्करी सलग उघड होत असल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी आता आपली मोडस ऑपरेंडी बदलवली आहे. तस्कर गांजाचे बंडल ट्रेनच्या एका कोचमध्ये लपवितात आणि पकडले जाऊ नये म्हणून स्वत: दुसऱ्याच बर्थवर बसतात, असे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य सांगतात.