गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये युपीतील गांजा तस्कर जेरबंद, ८० हजारांचा गांजा जप्त
By नरेश डोंगरे | Updated: March 15, 2024 22:08 IST2024-03-15T22:08:38+5:302024-03-15T22:08:50+5:30
दिल्लीला नेत होता गांजाची खेप

गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये युपीतील गांजा तस्कर जेरबंद, ८० हजारांचा गांजा जप्त
नागपूर: गोंडवाणा एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील एका गांजा तस्कराला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने नागपूर स्थानकावर जेरबंद केले. त्याच्याकडून ७८ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला, हा गांजा तो छत्तीसगडमधून दिल्लीला घेऊन जात होता.
येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर गोंडवाणा एक्सप्रेस गुरुवारी नेहमीप्रमाणे थांबली. या गाडीची तपासणी करणाऱ्या आरपीएफचे जवान जितेंद्र कुमार यांना जनरल बोगीत एक तरुण संशयास्पद अवस्थेत वावरताना दिसला. त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळच्या बॅगची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये ५ किलो १९३ ग्राम गांजा आढळला.
पुढच्या चाैकशीत त्याचे नाव समीर ईखलाक कुरेशी (वय १८) असल्याचे आणि तो उत्तर प्रदेशातील बरनावा (जि. बागपत) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. तो दुर्ग छत्तीसगड येथून हजरत निजामुद्दीन असे तिकिट घेऊन गोंडवाना एक्सप्रेसमध्ये चढला होता. अर्थात गांजाचे हे पार्सल घेऊन तो दिल्लीला जात होता. हा गांजा कुणाकडून आणला आणि तो कुणाला देणार होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरपीएफचे पोलीस निरीक्षक आर. एल. मिना यांनी चाैकशीनंतर आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत, ७७, ८९५ रुपये असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.