पाचपावलीत खुनाचा सूड घेण्यासाठी गॅंगवार; फरार आरोपी अखेर अटकेत
By योगेश पांडे | Updated: March 11, 2024 15:35 IST2024-03-11T15:34:12+5:302024-03-11T15:35:06+5:30
११ फेब्रुवारी रोजी पंचकुआ हनुमान मंदिराजवळ रोहित नाहरकर, श्याम कुसरे व राजकुमार लाचरवार यांनी भांजावर हल्ला करत त्याची हत्या केली.

पाचपावलीत खुनाचा सूड घेण्यासाठी गॅंगवार; फरार आरोपी अखेर अटकेत
नागपूर : प्रेम प्रकरणातील वादात मध्यस्थी करायला गेलेल्या अभिषेक ऊर्फ भांजा गुलाबे याच्या हत्येनंतर पाचपावलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भांजाच्या मित्रांनी खून करणाऱ्या आरोपीच्या सहकाऱ्यावर दिवसाढवळ्या हल्ला केला होता. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेतदेखील खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली आहे.
११ फेब्रुवारी रोजी पंचकुआ हनुमान मंदिराजवळ रोहित नाहरकर, श्याम कुसरे व राजकुमार लाचरवार यांनी भांजावर हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर भांजाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचे मित्र संधीच शोधत होते. १६ फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडी संपल्यावर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना तेथून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. न्यायालयात आरोपींचा मित्र संजय गजानन सिन्हा (२६) हा पोहोचला होता. तो सुनावणी आटोपल्यावर व्हीसीए चौकातील एका चहाटपरीवर गेला. त्याचवेळी भांजाचे मित्र मंगेश चिरूडकर, अभिषेक गांगलवार व इतर दोघे दुचाकीने तेथे पोहोचले. टपरीवर गर्दी असताना आरोपींनी संजयला घेरले व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संजय दचकला व कसाबसा तो जखमी अवस्थेतून तेथून पळाला. गर्दी असल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणात मंगेश व अभिषेकला अटक केली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यातील पथकाने ई-सर्व्हेलन्स व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हर्ष उर्फ पिंडा सदानंद आनंदपवार (२०, मराठा चौक, नाईक तलाव) तसेच विवेक उर्फ विक्की उर्फ छोटा आऊ रमेश वाघाडे (२३, तांडापेठ, मोचीपुरा) यांना ताब्यात घेतले त्यांनी संजयवर हल्ला केल्याची बाब कबुल केली. दोन्ही आरोपींना सदर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.