नागपूर मेट्रोत जुगार अन् धांगडधिंगा : ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ सुविधेची ‘ऐसीतैसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:41 PM2021-01-21T21:41:23+5:302021-01-21T21:44:35+5:30

Gambling in Nagpur Metro प्रवाशांना सेवा देण्यासाठी नागपुरात सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये बुधवारी सायंकाळी गंभीर प्रकार घडला. वाढदिवसासाठी बुक केलेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये धांगडधिंगा आणि पैशांची उधळण करण्यात आली. त्यामुळे मेट्रो रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केली की, अवैध प्रकारांसाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Gambling in Nagpur Metro : 'Celebration on Wheels' facility in problem | नागपूर मेट्रोत जुगार अन् धांगडधिंगा : ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ सुविधेची ‘ऐसीतैसी’

नागपूर मेट्रोत जुगार अन् धांगडधिंगा : ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ सुविधेची ‘ऐसीतैसी’

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : प्रवाशांना सेवा देण्यासाठी नागपुरात सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये बुधवारी सायंकाळी गंभीर प्रकार घडला. वाढदिवसासाठी बुक केलेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये धांगडधिंगा आणि पैशांची उधळण करण्यात आली. त्यामुळे मेट्रो रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केली की, अवैध प्रकारांसाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

प्रवाशांना सेवा देण्यासाठी उपराजधानीत मेट्रो रेल्वे सुरु करण्यात आली. नॉन फेअर रेव्हेन्यू वाढविण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाने ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ ही योजना सुरु केली. त्यानुसार ३,०५० रुपये भरून मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये वाढदिवस, हळदी-कुंकू, लग्नापूर्वीचे फोटो सेशन आदी करता येते. परंतु, बुधवारी मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये अजब प्रकार घडला. शेखर शिरभाते या व्यक्तीने आपल्या वाढदिवसासाठी सेलिब्रेशन ऑन व्हिल्स योजनेंतर्गत मेट्रो रेल्वेचे तीन कोच बुक केले. त्यानुसार अ‍ॅक्वा लाईनवर सीताबर्डी ते लोकमान्य नगरपर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नाचगाणे करण्यासाठी तृतीयपंथीयांना नेण्यात आले. तृतीयपंथी नाचगाणे करत असताना वाढदिवसात सहभागी नागरिकांनी त्यांच्यावर पैशांची उधळण केली तर काहीजण जुगार खेळत बसले होते. जुगार खेळताना पैसेही लावण्यात येत होते. हा गंभीर प्रकार काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून व्हायरल केला. मेट्रो रेल्वेत हा प्रकार घडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करून मेट्रो रेल्वे प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. भविष्यात मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये दारुची विक्रीही सुरु करा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

नाचगाण्यासाठी मेट्रोचे कोच देणे अशोभनीय

मेट्रोला नाचगाण्यासाठी कोच उपलब्ध करून देणे शोभत नाही. ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’च्या नावाखाली गंभीर घटना घडू शकते, ही बाब आम्ही अनेकदा मेट्रो रेल्वेच्या लक्षात आणून दिली. परंतु, त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. भविष्यात मेट्रो रेल्वेची शान टिकून राहण्यासाठी कडक नियम करावेत तसेच मेट्रो रेल्वे फक्त प्रवाशांसाठी चालविण्याची मागणी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे.

अवैध प्रकार करणाऱ्यांना प्रवास बंदी

मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये नाचगाणे आणि जुगार खेळण्याचा प्रकार घडल्यामुळे मेट्रो रेल्वेने यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित व्यक्तीला पत्र देऊन विचारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मेट्रोच्या कोचमध्ये अवैध प्रकार करणाऱ्यांना भविष्यात मेट्रोतून प्रवास करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिपॉझिट जप्त करणार

`मेट्रो रेल्वेत भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी मेट्रोचे नियम कडक करण्यात येतील. मेट्रोचे कोच बुक करण्यासाठी डिपॉझिट वाढविण्यात येईल. तसेच मेट्रो रेल्वेत अवैध प्रकार करणाऱ्यांचे डिपॉझिट रद्द करण्याचा विचार आहे.`

- अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक, कार्पोरेट कम्युनिकेशन, मेट्रो रेल्वे

Web Title: Gambling in Nagpur Metro : 'Celebration on Wheels' facility in problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.