विवाहितेच्या संसारात विष कालवू पाहणारा गजाआड,मोबाइलवर पाठवले लग्नापूर्वीचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 20:38 IST2021-04-27T20:32:47+5:302021-04-27T20:38:39+5:30
Molestation, crime news विवाहित मैत्रिणीचा पिच्छा पुरवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या एका आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.

विवाहितेच्या संसारात विष कालवू पाहणारा गजाआड,मोबाइलवर पाठवले लग्नापूर्वीचे फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित मैत्रिणीचा पिच्छा पुरवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या एका आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. किशोर मनोहर घाडगे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नरखेड तालुक्यातील रहिवासी असून सध्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तक्रारदार महिलेसोबत त्याची तिचे लग्न होण्यापूर्वी मैत्री होती. त्या वेळी आरोपीने तिच्यासोबत आपले फोटो काढून ठेवले होते. दरम्यान, तरुणीचे लग्न झाले आणि ती गिट्टीखदानमध्ये सासरी राहायला आली. त्यानंतर आरोपी तिचा सारखा मानसिक छळ करू लागला. तिला वारंवार भेटण्यासाठी बाद्य करू लागला. ती भेटायला नकार देत असल्यामुळे मोबाइलवर तिला तिच्या सोबतचे फोटो पाठवणे, मेसेज पाठवणे आणि फोन करून त्रास देण्याचा उपद्व्याप आरोपी किशोरने सुरू केला. १ जानेवारीपासून २२ एप्रिलपर्यंत त्याचा हा उपद्रव सुरू होता. महिलेने त्याला वारंवार असे प्रकार करू नको, अशी विनंती केली. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. त्याने तिच्या नातेवाइकांचे मोबाइल नंबर मिळवून त्यावरसुद्धा तिच्या सोबतचे फोटो व्हाॅट्सॲपने पाठवले. त्याच्याकडून होणारा मानसिक छळ असह्य झाल्यामुळे पीडित महिलेने सोमवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.