'जी - २०'च्या स्वागतासाठी नववधू सारखे सजणार शहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:13 IST2023-01-16T12:12:04+5:302023-01-16T12:13:50+5:30
G 20 summit nagpur : स्वागतासाठी होणार १७० कोटींवर खर्च : ४९ कोटींला मंजुरी, मनपाने पुन्हा पाठविला १२२ कोटींचा प्रस्ताव

'जी - २०'च्या स्वागतासाठी नववधू सारखे सजणार शहर
नागपूर : ‘जी-२०’ च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूर शहर नववधू सारखे सजणार आहे. शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने आणि रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींची रंगरंगोटी, शहरभर जी-२० चे होर्डिंग लागणार आहे. यासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला अपेक्षित असून, सरकारने खर्चासाठी ४९ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. महापालिकेला शहराच्या बाहेरही सौंदर्यीकरण करावयाचे आहे. त्यासाठी पुन्हा १२२ कोटींचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठविला आहे.
जी-२०’ आंतरराष्ट्रीय परिषद नागपुरात होणार असून, उपराजधानीला चकाचक करण्यात येत आहे. या बैठकीत २० देशांतील दोनशेवर प्रतिनिधी सहभागी होणार आहे. त्यांच्या आगमनापूर्वी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची कसरत सुरू आहे. जी-२० साठी शहराला नववधू सारखे सजविण्याची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने ४९ कोटी मंजूर केले असले तरी अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. तरीही मनपाने शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरण, भिंतींची रंगरंगोटी, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ, दुभाजकावर झाडे लावण्याचे काम सुरू केले आहे.
शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने आणि रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींची रंगरंगोटी, तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती, ड्रेनेज आदी कामांसाठी हा निधी वापरला जात आहे. या बैठकीत सहभागी होणारे विविध देशांचे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांची पाहणी करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन ‘जी-२०’साठी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिका सक्रिय झाली आहे.
- वर्धा रोडवर विशेष लक्ष
वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये जी-२० ची परिषद होणार आहे. त्यामुळे हा परिसर चकाचक केला जात आहे. शहराच्या हद्दीबाहेर ही मनपालाच कामे करावी लागणार आहे. त्यासाठी १२२ कोटी निधीचा नवीन प्रस्ताव मनपाने राज्य शासनाला पाठविला असल्याचे मनपाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सांगितले.