रेल्वेच्या जेवणावर क्यूआर कोड स्कॅन करताच दिसणार पूर्ण कुंडली; आयआरसीटीसीचा तक्रारींवर उपाय
By नरेश डोंगरे | Updated: March 21, 2026 19:43 IST2026-03-21T19:43:13+5:302026-03-21T19:43:56+5:30
Nagpur : ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने प्रभावी उपाययोजना आखली आहे.

Full information will be visible by scanning QR code on railway food; IRCTC's solution to complaints
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने प्रभावी उपाययोजना आखली आहे. त्यानुसार आता ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर क्यूआर कोड लावण्यात येत आहे. तो स्कॅन करताच प्रवाशांना फूड पॅकेटची पूर्ण कुंडलीच दिसणार आहे.
रेल्वेत मिळणाऱ्या खाद्य पदार्थांबाबत नियमित वेगवेगळ्या तक्रारी असतात. त्याचा दर्जा ठिक नसतो, ते थंड असतात किंवा शिळे असतात, असे तक्रारींचे स्वरूप असते. अनेक गाड्यांमध्ये बेकायदेशीर विक्रेतेही अन्न विकतात. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने क्यूआर कोड सिस्टम लागू केली आहे. त्यानुसार, ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या फूड पॅकेटवर एक क्यूआर कोड असेल. तो स्कॅन केल्यावर हातात असलेले खाद्यान्न कधी तयार केले, ते कधी पॅकिंग करण्यात आले. त्याची कालबाह्य होण्याची तारीख (एक्सपायरी डेट) तसेच ज्या ठिकाणी हे अन्न तयार झाले, त्या किचनचे नाव संबंधित प्रवाशांना तत्काळ माहिती पडेल. त्यावरून हे खाद्यान्न ताजे आणि सुरक्षित आहे की नाही, ते प्रवाशांना लगेच कळेल.
बेकायदेशीर विक्रेत्यांवर लगाम
अनेक गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यान्न विकतात. या प्रणालीमुळे बेकायदेशीर अन्न विक्रीला आळा बसणार आहे. क्यूआर कोड नसलेले पॅकेट सहज ओळखता येईल. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्याची डिजिटल पुराव्यासह लगेच तक्रार नोंदविता येणार आहे.
तक्रार करणे झाले सोपे
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर माहिती चुकीची आढळली किंवा अन्न खराब निघाले, तर प्रवासी लगेच ‘रेल मदत’ पोर्टल किंवा अधिकृत ॲपद्वारे तक्रार करू शकणार आहे. विशेष म्हणजे, तक्रारीसोबत स्कॅनरच्या रूपातील डिजिटल पुरावादेखील जोडता येणार आहे. परिणामी, संबंधितांवर लगेच आणि प्रभावी कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
"प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न आहेत. त्याचाच हा एक भाग आहे."
-अमन मित्तल, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.