सोशल मीडियावर मैत्री पडली महागात, पैशांसाठी ब्लॅकमेल करून विनयभंग
By दयानंद पाईकराव | Updated: August 19, 2023 15:02 IST2023-08-19T15:00:42+5:302023-08-19T15:02:05+5:30
गुन्हा दाखल करून आरोपीस अटक

सोशल मीडियावर मैत्री पडली महागात, पैशांसाठी ब्लॅकमेल करून विनयभंग
नागपूर : सोशल मिडियावर मैत्री झाल्यानंतर पैसे उकळून युवतीचा विनयभंग केल्याची घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
आजम रशीद खान (वय २१, रा. श्याम लॉन मागे, जाफरनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १८ वर्षाच्या युवतीची आरोपी आजमसोबत सोशल मिडियावर ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पैशांची मागणी केली. आरोपीने तिला वारंवार पैसे मागितल्याने तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला अश्लील शिविगाळ करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
आरोपीने तिचा जी मेल आयडी घेऊन तिच्याकडून १.५० लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेतला. त्यानंतरही आरोपीने पैशांची मागणी करून सोशल मिडियावर तिचा पाठलाग करून पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी आरोपीविरुद्ध कलम ३८६, ३५४ (ड), २९४, ५०६ (२), सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.