इंस्टाग्रामवरील मैत्रीने घेतला जीव ! मुलीशी मैत्रीवरून वाद झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:21 IST2025-11-01T15:19:02+5:302025-11-01T15:21:01+5:30
Nagpur : तेथे त्यांच्यात बोलणे सुरू झाले व काही वेळातच वाद पेटला. आरोपींनी शिवीगाळ करत नूरला घेरले व त्याला चाकूने भोसकले. यात नूर गंभीर जखमी झाला; तर आरोपी तेथून फरार झाले.

Friendship on Instagram took his life! College student killed after argument over friendship with girl
नागपूर : मुलीशी मैत्रीवरून झालेल्या वादात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याच एका सहकाऱ्याची हत्या केली. मृत व आरोपी हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एचबी टाउन परिसरात ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
नूर नवाज हुसेन (२२, सुभाननगर) असे मृताचे नाव आहे; तर हर्षल व के. बिसेन हे आरोपी आहेत. नूर आणि आरोपींमध्ये एका मुलीशी झालेल्या मैत्रीवरून वाद सुरू होता. त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले होते. आरोपींनी समेट घडवून आणण्याच्या बहाण्याने शुक्रवारी रात्री १० वाजता नूरला एचबी टाऊन परिसरात बोलविले.
तेथे त्यांच्यात बोलणे सुरू झाले व काही वेळातच वाद पेटला. आरोपींनी शिवीगाळ करत नूरला घेरले व त्याला चाकूने भोसकले. यात नूर गंभीर जखमी झाला; तर आरोपी तेथून फरार झाले. या प्रकारामुळे घटनास्थळावर खळबळ उडाली. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले व नूरला तातडीने मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत बिसेनला ताब्यात घेतले. इतर आरोपींचादेखील शोध सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व आरोपी हे शहरातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी होते. त्यांच्यात सुरुवातीला चांगले संबंध होते; परंतु एका मुलीच्या मैत्रीवरून त्यात वितुष्ट आले होते.