कॉलेजची बदनामी करण्याची धमकी देत माजी उपप्राचार्याने मागितली पाच कोटींची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:17 IST2025-08-20T16:14:57+5:302025-08-20T16:17:39+5:30
Nagpur : महाविद्यालयाला बदनामी करण्याची धमकी

Former vice-principal demands Rs 5 crore ransom, threatens to defame college
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यातील एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. शहरातील सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांना पाच कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या आदर्श फार्मसी कॉलेजच्या बदनामीची धमकी देण्यात आली. या प्रकरणात त्याच ठिकाणी २०१२ पर्यंत कार्यरत असलेल्या होमिओपॅथी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. गोपाल भुतडाविरोधात (५२, वाठोडा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गंगाधर नाकाडे (वय ६०, रा. आनंद नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) हे सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत त्या ठिकाणी होमिओपॅथी कॉलेज कार्यरत होते. त्यावेळी डॉ. गोपाल राणीलालजी भुतडा हे उपप्राचार्य म्हणून काम करत होते. मात्र, ते महाविद्यालय बंद झाले. त्यानंतर नाकाडे यांनी बी.फार्म व डी. फार्म परवानगी अभ्यासक्रमांसाठी मिळवून फार्मसी कॉलेज सुरू केले. कॉलेज सुरू होताच आरोपी डॉ. भुतडा यांनी विविध सरकारी व खासगी विभागांना १००हून अधिक तक्रारी करून संस्थेची बदनामी करण्यास सुरुवात केली. या तक्रारींची चौकशी होऊन त्या वारंवार निष्फळ ठरल्या तरी त्यांनी बदनामी थांबवली नाही. यात भर म्हणून त्यांनी नाकाडे यांना प्रत्यक्ष व संदेशाद्वारे धमक्या देणे सुरू केले. कधी 'तुमचे कॉलेज बंद करून टाकीन' तर कधी 'माझे जुने सहकारी व प्राचार्याचे कोट्यवधी रुपये बाकी आहेत, अन्यथा तुम्हीच पैसे द्या', अशी मागणी केली.
याच पार्श्वभूमीवर, ३ जून २०२५ रोजी आरोपी डॉ. भुतडा यांनी संस्थेचे कर्मचारी कुणाल गायकवाड यांना भेटून सांगितले की, नाकाडे यांनी ५ कोटी रुपये आणून द्यावे. मग मी सर्व तक्रारी बंद करीन. अन्यथा तुमच्या संस्थेला वाईट दिवस दाखवेन, अशी धमकी दिली. या सततच्या धमक्या व खंडणीच्या मागण्यांमुळे संस्थेने तातडीची बैठक घेऊन पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नाकाडे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.