आम्ही मूळचे हैद्राबादमधील. एका साधारण, मध्यम कुटुंबात जन्म झाला. वडील इलेक्ट्रिशियन, आई गृहिणी. शाळेच असतानाच वयाच्या ११ व्या वर्षापासून मी क्रिकेट खेळणे सुरू केले. बालवयातच माझा खेळ अनेकांचे लक्ष वेधून घेऊ लागला. वडिलांना वाटायचे की, आम्ही भावांनी चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे; पण माझ्या मनात दुसरेच काही होते. शाळेत असताना एकदा मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळत होतो. माझ्यावर एका प्रशिक्षकाची नजर पडली. त्यांचे नाव सलीम बायश. ज्यांच्यामुळे मी येथपर्यंत पोहोचलो.
मी कमी वयात चांगला खेळतो, हे बायश सरांनी हेरलं. मला योग्य प्रशिक्षणाची गरज ओळखून ते माझ्या आई-वडिलांना भेटले. माझ्यात दडलेला उत्कृष्ट खेळाडू त्यांनी कुटुंबीयांना पटवून दिला. आमची आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही कुटुंबाने साथ दिली. वयाच्या १६ व्या वर्षी हैदराबादकडून पदार्पण, २०२० मध्ये भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप संघात स्थान मिळविले. त्यानंतर मी थांबलोच नाही. सामन्यात दबाव असेल तर मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या प्रशिक्षकांनी मला शिकवले आहे. मी दबावात खेळलो तर माझ्या देशाला निराश करेल. म्हणून देश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी देशासाठी आयुष्यही देईन.
...अन् माझ्याकडे पैसेच नव्हते
एकदा तर माझ्याकडे बॅट आणि खेळासाठी लागणारे काही साहित्य घेण्यापुरतेही पैसे नव्हते. बायश सरांना याची जाणीव होती. मी सकाळी ६ ते सायंकाळी ६ असे १२ तास सरांसोबत सराव करायचो. एका खेळाडूने सरांकडे बॅट आणि काही बाबी सोपवल्या होत्या. सरांनी त्या मला दिल्या. मी त्यावरच खेळायचो. हीच बॅट तुटली तेव्हा मी वारंवार टेप गुंडाळून ती वापरली आणि माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे सामने त्या बॅटने जिंकलो. थोडक्यात परिस्थिती कशीही असो, परिश्रमाची तयारी संकटावर मात करते.
पालकांना माझी चिंता होती की...
क्रिकेट खेळायला जायचे म्हणून मी शाळेमध्ये वारंवार परवानगी मागायचो. कधीकधी शाळेकडून परवानगी नाकारली जायची. सारखे, क्रिकेट-क्रिकेट काय करतो, अभ्यासात लक्ष दे, असे मला बजावले जायचे.
मग प्रशिक्षक परवानगी मिळवून द्यायचे. पुढे तर मी फक्त परीक्षेपुरता शाळा, कॉलेजमध्ये जाऊ लागतो. यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटायची की, क्रिकेटमधून याला काही मिळालं नाही तर भविष्यात कसं व्हायचं.
(संकलन : महेश घोराळे)