Forest tourism in Navegaon-Nagzira from November 1 | नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन

नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच, ताडोबा आणि उमरेड कऱ्हांडलाच्या पाठोपाठ आता नवेगाव-नागझिरामधील वन पर्यटनदेखील सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून पावसाळ्यामुळे येथील पर्यटन एक महिना उशिराने सुरू होत आहे.
नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात २४ सप्टेंबरला एक पत्र प्रसृत करून १ नोव्हेंबरपासून नियमांसह येथील पर्यटन सुरू करण्याची घोषणा केली. देशभरात झालेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्वत्र ३१ मेपर्यंत लॉकडाऊन होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून जून महिन्यामध्ये वन पर्यटन सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. यादरम्यान पावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार ३० जूनपासून नवेगाव-नागझिरा येथील पर्यटन बंद करण्यात आले होते. आता पावसाळा संपल्याने हे पर्यटन पुनश्च सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एनटीसीएच्या दिशानिर्देशांचे पालन करूनच येथील पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे. १० वर्षाआतील आणि ६५ वर्षावरील नागरिकांना पर्यटनास बंदी असून आरोग्य तपासणी केल्यावरच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे. खुल्या जिप्सीमध्ये चालक व गाईड यांच्यासह फक्त चार पर्यटकांनाच अनुमती आहे.

Web Title: Forest tourism in Navegaon-Nagzira from November 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.