जलालखेडा ग्रा.पं.वर सुधार समितीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:04+5:302021-02-13T04:09:04+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील १३ सदस्यीय जलालखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी जलालखेडा सुधार समितीच्या कैलाश जगन निकोस यांची बिनविरोध निवड करण्यात ...

जलालखेडा ग्रा.पं.वर सुधार समितीचा झेंडा
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील १३ सदस्यीय जलालखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी जलालखेडा सुधार समितीच्या कैलाश जगन निकोस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रा.पं.च्या निवडणुकीत गतवेळच्या सत्ताधारी पॅनलचा १३ पैकी केवळ ४ जागेवर विजय झाला होता. ९ जागांवर जनक्रांती पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ज्यांचे बहुमत त्यांची सत्ता असे समीकरण प्रत्येक निवडणुकीमध्ये असते. मात्र १ फेब्रुवारीला जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमुळे जनक्रांती पॅनलला धक्का बसला. येथील सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे बहुमत नसताना ४ सदस्य निवडून आलेल्या जलालखेडा सुधार समितीचे कैलाश निकोस यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. इकडे उपसरपंच पदासाठी जनक्रांती पॅनलमध्ये फूट पडली. यामध्ये भाजपा समर्थीत गटाने उपसरपंचपदासाठी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करत मयूर रमेश सोनोने यांना उपसरपंच बनवले. त्यामुळे जलालखेडा ग्रामपंचायतीमध्ये आता महाविकास आघाडी व बीजेपी असे समीकरण पाहायला मिळाले. जलालखेडा सुधार समितीचे प्रमोद पेठे व कुलदीप हिवरकर हे महत्त्वाचे उमेदवार पराजित झाल्यामुळे सिंह गेला व गड ही गेला अशी चर्चा परिसरात रंगली होती; मात्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला असे समीकरण पाहायला मिळाले. कैलाश निकोसे हे पेठे, हिवरकर पॅनलकडून बिनविरोध निवडून आले तर उपसरपंचपदासाठी मयूर सोनोने व अधीर चौधरी यांनी अर्ज भरला होता. त्यात मयूर सोनोने ८ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर दोन्ही पॅनलकडून गावात विजयी रॅली काढण्यात आली.