हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 10:27 IST2022-03-09T18:31:04+5:302022-03-10T10:27:54+5:30
बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनी भागात के. टी. वाईन शॉपसमोर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या भिंतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा मृत अर्भकं आढळून आले.

हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ
नागपूर : लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनी भागात भरवस्तीत मोकळ्या मैदानाच्या भितींशेजारी बुधवारी सायंकाळी सहा मृत अर्भक सापडले. वर्दळीचा परिसर असलेल्या या भागात हा प्रकार आढळल्याने एकच खळबळ उडाली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे गर्भपाताच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे वृत्त ताजे असतानाच हे नवे प्रकरण नागपुरात पुढे आले आहे. त्यामुळे हे पाप कुणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनी भागात के. टी. वाईन शॉपसमोर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या भिंतीशेजारील कचऱ्याच्या ढिगावर एका युवकाला प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी संशयास्पदरीत्या गुंडाळलेले दिसले. उत्सुकतेमुळे त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्यात रक्ताचे डाग असलेले कापड दिसले. संशय आल्यामुळे त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लकडगंज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने गोळा झाले. कायदेशीर सोपस्काराचा भाग म्हणून पोलिसांनी अर्भक ताब्यात घेण्यासाठी नागपूर न्याय वैद्यक विभागाच्या पथकास पाचारण केले. पथकाच्या चौकशीत एक नव्हे तर चक्क सहा अर्भक असल्याचे आढळले. बाजूलाच एक बॉक्स आढळला. त्यात किडनी, हाडे असल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश अर्भक मुलींचे असून विकसित असल्याचे सांगण्यात येत आहे. ते पथकाने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले.
प्रकार अवैध गर्भपात केंद्रातूनच ?
मिळालेले बहुतांश अर्भक मुलींचे असून अर्भकांच्या शेजारी औषधांचे बॉक्सही सापडले आहेत. त्यामुळे हे अर्भक अवैध गर्भपात केंद्रातील असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सोनाग्राफी केंद्र आणि अवैध गर्भपात केंद्राच्या माध्यमातून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांकडून या भागात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. त्यानंतरच ते कोणी आणून टाकले याचा खुलासा होऊ शकणार आहे.