बाबासाहेबांच्या नावाने अमेरिकेत पहिला जागतिक तत्त्वज्ञान पुरस्कार; अमेरिकन तत्वज्ञान संस्थेची मोठी घोषणा
By आनंद डेकाटे | Updated: April 13, 2026 15:53 IST2026-04-13T15:51:45+5:302026-04-13T15:53:40+5:30
Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली असून सोसायटी फाॅर ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलाॅसाॅफी या अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेने ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

First World Philosophy Award in America named after Babasaheb; Big announcement from American Philosophical Society
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली असून सोसायटी फाॅर ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलाॅसाॅफी या अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेने ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. ‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ या क्षेत्रातील हा पुरस्कार अमेरिकेतील एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने सुरू होणारा पहिलाच जागतिक सन्मान ठरत आहे. या निर्णयामुळे डॉ. आंबेडकरांचे विचार केवळ भारतीय सामाजिक परिवर्तनापुरते मर्यादित नसून जागतिक तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकन तत्त्वज्ञान आणि जगातील विविध बौद्धिक परंपरांमध्ये अधिक सखोल संवाद घडवून आणणे, विशेषतः दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या आशिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशांतील विचारपरंपरांना मुख्य प्रवाहात आणणे, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे संचालक मंडळ सदस्य स्कॉट आर. स्ट्राउड यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळ आधुनिक तत्त्वज्ञानातील प्रॅग्मॅटिझम हा पाश्चात्त्य परंपरेतच विकसित झालेला विचारप्रवाह मानला जात होता. मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन झालेला हा पुरस्कार त्या समजुतीला मूलगामी आव्हान देणारा ठरला आहे. डॉ. आंबेडकरांनी जॉन ड्यूई यांच्या प्रयोगशील विचारांना सामाजिक न्याय, संघर्ष, विषमता आणि नैतिक परिवर्तनाच्या चौकटीत नव्याने मांडले, हे या मान्यतेतून अधोरेखित झाले.
लोकशाहीविषयी डॉ. आंबेडकरांची मांडणीही या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांच्या मते लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून सामाजिक जीवनपद्धती आहे, जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर उभी आहे. जातव्यवस्थेसारख्या क्रमबद्ध विषमतेच्या प्रश्नाला लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणण्याचे धाडस डॉ. आंबेडकरांनी दाखवले होते. त्यामुळे त्यांचे विचार आजच्या जागतिक विषमता, प्रतिनिधित्व आणि लोकशाही संकटांच्या चर्चेत अधिकच महत्त्वाचे ठरत आहेत.
या नव्या पुरस्कारातून विविध सांस्कृतिक परंपरांमधील बौद्धिक संवादाला चालना देण्याचा प्रयत्न दिसून येतो. अमेरिकन तत्त्वज्ञान आणि आशिया-आफ्रिकेतील विचारप्रवाह यांच्यातील संवादातून तत्त्वज्ञानाचा भविष्यातील मार्ग अधिक व्यापक आणि समावेशक होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतीय शैक्षणिक विश्वासाठीही ही घटना आत्मपरीक्षणाची संधी मानली जात आहे. डॉ. आंबेडकरांना केवळ राज्यघटनाकार किंवा समाजसुधारक म्हणून नव्हे, तर जागतिक दर्जाचे तत्त्वज्ञ म्हणून समजून घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
एकूणच, अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेचा हा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक बौद्धिक विश्वाच्या केंद्रस्थानी नेणारा ऐतिहासिक टप्पा ठरत असून, तत्त्वज्ञानाच्या सीमांचे नव्याने पुनर्मूल्यांकन करण्याची ही महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जात आहे.