नागपुरात प्रथमच यकृत प्रत्यारोपण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:56 AM2018-06-20T09:56:28+5:302018-06-20T09:56:37+5:30

पहिल्यांदाच वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या यकृत प्रत्यारोपणामुळे एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले, अशी माहिती यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.

For the first time in Nagpur, liver transplant is successful | नागपुरात प्रथमच यकृत प्रत्यारोपण यशस्वी

नागपुरात प्रथमच यकृत प्रत्यारोपण यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. गौरव गुप्ता यांची माहितीमहिलेला जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यकृत प्रत्यारोपणानंतर इन्फेक्शनचा धोका सर्वात जास्त असतो. परंतु नव्या व प्रभावी औषधे, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामुळे हा धोका फार कमी झालेला आहे. परिणामी, यकृत प्रत्यारोपणाचा यशाचा दर वाढून ९७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ५ जून रोजी पहिल्यांदाच वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या यकृत प्रत्यारोपणामुळे एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले, अशी माहिती यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.
वर्धेतील ३३ वर्षीय इसमाचे मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्यानंतर त्यांचे यकृत ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने नागपुरात आणले. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेवर त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया तब्बल १० तास चालली. या शस्त्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी वोक्हार्ट नागपूर केंद्राच्या प्रमुख डॉ. के. सुजाथा उपस्थित होत्या.
डॉ. गुप्ता म्हणाले, विविध कारणांमुळे यकृत निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात दरवर्षी तीन लाख नवे रुग्ण आढळून येतात. यात मृत्यूचे प्रमाण २.९५ टक्के आहे. यकृत निकामी झाल्यावर यकृत प्रत्यारोपण हाच उपचार आहे. यासाठी रक्तगट जुळणाऱ्या जवळच्या नातेवाईकांकडून (लाईव्ह) किंवा मेंदू मृत व्यक्तीकडून (कॅडेव्हर) यकृतदान झाल्यावरच प्रत्यारोपण शक्य होते. परंतु भारतात अवयवदानाचा टक्का केवळ ०.५ टक्केच आहे. भारतात ‘लाईव्ह डोनर’ची टक्केवारी ८० ते ९० टक्के तर ‘कॅडेव्हर डोनर’ची टक्केवारी २० ते ३० टक्के आहे; प्रगत देशात याच्या उलट टक्केवारी आहे.

नागपुरात यकृत प्रत्यारोपणाला लागली ५१ वर्षे
१९६७ मध्ये यकृत प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. नागपुरात हे प्रत्यारोपण सुरू व्हायला ५१ वर्षे लागली. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण झालेल्या महिलेचे गेल्या सहा महिन्यांपासून यकृत निकामी झाले होते. त्यांच्या नातेवाईकांचा रक्तगट जुळत नसल्याने व इतरही काही कारणांमुळे त्या मेंदू मृत दात्यावर अवलंबून होत्या. अखेर ५ जून रोजी दाता मिळाला. परंतु वाढलेल्या इन्फेक्शनमुळे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली होती. अखेर १० तासांच्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वी प्रत्यारोपण झाले. या शस्त्रक्रियेत डॉ. गौरव गुप्ता, डॉ. अनुराग श्रीमल, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अंजली पत्की, डॉ. सौरभ कामत, डॉ. स्वानंद मेलाग, डॉ. दिनेश आणि डॉ. अमित गुप्ते यांचा समावेश होता. डॉ. के. सुजाथा यांनी सांगितले, १२० मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले; आता हृदय प्रत्यारोपणासाठी प्रयत्न केले जाईल.

Web Title: For the first time in Nagpur, liver transplant is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य