नागपुरातील फायरिंग पुर्वनियोजितच, कॅफेसमोर आरोपींनी अगोदर केली ‘रेकी’
By योगेश पांडे | Updated: April 16, 2025 22:03 IST2025-04-16T22:02:02+5:302025-04-16T22:03:42+5:30
हिरणवार टोळीचे सदस्य फरारच : पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह

नागपुरातील फायरिंग पुर्वनियोजितच, कॅफेसमोर आरोपींनी अगोदर केली ‘रेकी’
नागपूर : धरमपेठ येथील सोशा कॅफेचा मालक अविनाश भुसारी याची गोळीबारात हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हिरणवार टोळीचा हात असल्याची बाब समोर आली आहे. आरोपींनी अविनाशची हत्या करण्याअगोदर कॅफेची सविस्तर रेकी केली होती. आरोपी अगोदर बराच वेळ कॅफेजवळ घुटमळले व फोनवरून सूचना मिळाल्यावरच आरोपींनी अविनाशवर जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. आरोपींनी सोशा कॅफेतच अविनाशचा गेम करण्याची योजना बनविली होती. मात्र तो कॅफेबाहेर असल्याने रस्त्यावरच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील हिरणवार टोळीतील आरोपी फरारच असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर या घटनेतून सवाल उपस्थित होत आहेत.
धरमपेठमध्ये रामनगर चौक आणि लक्ष्मी भवन चौकाच्या दरम्यान अविनाशचा सोशा कॅफे आहे. मध्यरात्री १२.५० वाजता वाजता कॅफे बंद केल्यानंतर, अविनाश एका खासगी बँकेसमोर आईस गोला खाण्यासाठी सुरक्षारक्षकाला घेऊन गेला. तेथे निंबस कॅफेच्या व्यवस्थापकासोबत आईस डिश खाऊ लागला व सुरक्षारक्षकाला परत पाठविले. सुरक्षारक्षक कॅफेखाली पोहोचला असताना एक आरोपी तेथे आला व कॅफेबाबत विचारणा करू लागला. मात्र कॅफे बंद झाल्याचे सांगितल्यावरदेखील तो आरोपी तेथेच उभा होता. रात्री सव्वा वाजताच्या सुमारास आणखी दोन आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आले व ते कॅफेच्या दुसऱ्या बाजूच्या मार्गावर जाऊन थांबले. मागे बसलेल्या आरोपीने पिस्तुल काढली व कुणाला तरी फोन लावला. हे सुरक्षारक्षकाने पाहिले होते. मात्र काही वेळातच मोटारसायकल निम्बस कॅफेकडे गेली. त्याच्या काही सेकंदअगोदर एक पांढरी मोपेडदेखील तिकडेच गेली. दोनही दुचाकींवरील मागे बसलेल्या आरोपींनी अविनाश यांच्यावर जवळून सहा गोळ्या झाडल्या. आरोपींना अविनाशच्या कॅफेतून जाण्याचा, तेथून आईस गोला खाण्याच्या वेळेची पूर्ण माहिती होती. आरोपींनी तो फोन नेमका कुणाला केला होता यातून आणखी नवीन लिंक समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांची शोधमोहीम सुरू
शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार, ऋतिक धीरज हिरणवार, शशिकांत ऊर्फ सोनू ऊर्फ जंगली दिलीप शेंद्रे, सिद्धांत भारद्वाज, सिद्धांत भारद्वाज, मोनू ऊर्फ मोन्या कालसर्पे, शक्ति राजेश यादव, बाबू हिरणवार, सिद्धू नावाचा युवक आणि इतर तीन ते चार जणांनी नियोजनबद्ध पद्धतीने अविनाशची हत्या केली. शेंद्रे आणि सिद्धांत भारद्वाज याला अटक करण्यात आली होती. मात्र इतर आरोपी फरारच आहेत.
पोलिसांची हलगर्जी भोवली
जानेवारी महिन्यात बंटीचा भाऊ पवन हिरणवार हा बाभूळखेडा सावनेर येथील बेलोरा हनुमान मंदिरातून परतत असताना शेखू टोळीने त्याची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात सावनेर पोलिसांनी शेखू आणि अविनाशच्या चुलत भावाला अटक केली होती. तडीपार असतानादेखील हिरणवार टोळीतील सदस्य शहरात सक्रिय होते. पोलिसांचा त्यांच्यावर वॉच नव्हता का हा मोठा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.