नागपुरात मेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:42 IST2019-09-09T20:41:20+5:302019-09-09T20:42:19+5:30
महामेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पण ही मॉक ड्रील होती.

नागपुरात मेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. यामुळे काही काळ स्टेशनवर खळबळ माजली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्टेशनवर उपस्थित पर्यवेक्षकांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आग आटोक्यात येत नसल्याने त्वरित सेफ्टी सुपरवायझरला माहिती देण्यात आली. नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाशी संपर्क करण्यात आला. विभागाच्या जवानांनी त्वरित अग्निशमन यंत्रणांचा उपयोग करून अवघ्या १० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. पण ही मॉक ड्रील होती.
मेट्रो स्टेशनवर एखादे कार्य सुरू असताना अचानक आग लागल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि आगीवर कसे नियंत्रण कसे मिळवावे, यासाठी महा मेट्रोतर्फे मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. रिच-३ अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनवर राबविण्यात आलेली संपूर्ण मॉक ड्रिल प्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर मॉक ड्रील अंतर्गत घटनेचा अहवाल भविष्यातील संदर्भासाठी नोंदविला गेला आहे. या मॉक ड्रीलमध्ये महा मेट्रोच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होेते.