अखेर शालार्थ घोटाळ्यातील ‘वॉन्टेंड’ नीलेश वाघमारेला अटक

By योगेश पांडे | Updated: August 14, 2025 20:29 IST2025-08-14T20:28:06+5:302025-08-14T20:29:39+5:30

चौकशीतून समोर येतील अनेक ‘लिंक्स’ : चार महिन्यांपासून होता फरार

Finally, Nilesh Waghmare, the 'wanted' in the scholarship scam, is arrested. | अखेर शालार्थ घोटाळ्यातील ‘वॉन्टेंड’ नीलेश वाघमारेला अटक

Finally, Nilesh Waghmare, the 'wanted' in the scholarship scam, is arrested.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शालार्थ आयडी घोटाळ्यातील महत्त्वाची ‘लिंक’ असलेला वेतन विभाग अधीक्षक नीलेश बाबुराव वाघमारे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक मोठ्या लिंक्स समोर येण्याची शक्यता आहे. वाघमारे हा चार महिन्यांपासून फरार होता व त्याचा अगदी गोव्यातदेखील जाऊन एसआयटी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध घेतला होता. ‘लोकमत’ने वारंवार नीलेश वाघमारे फरार असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

राज्यभर गाजत असलेला कोट्यवधींच्या शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक नियुक्ती घोटाळ्यात आतापर्यंत २४ हून अधिक जणांना अटक झाली आहे. यातून पोलिसांच्या हातात रोज नवीन माहिती येत आहे. नीलेश वाघमारे हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. नीलेश वाघमारे याचा एसआयटीच्या पथकाने नागपुरात अनेक ठिकाणी शोध घेतला. गोवा येथे त्याची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गोवा येथे जाऊन संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्याला लपण्यास मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाईचा इशारा देण्यात आला होता. उपसंचालक दर्जाचे अधिकारी एसआयटीच्या जाळ्यात अडकले असताना, वाघमारे त्यांच्या हाती लागू नये, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी होती.

‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर सायबर पोलीस व एसआयटीकडून परत एकदा वाघमारेचा वेगाने शोध सुरू झाला होता. तो काही दिवसांपासून नागपुरात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. तांत्रिक तपासाच्या आधारे तो धरमपेठमध्ये लपला असल्याचे स्पष्ट झाले. त्याला गुरुवारी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तेथून उचलले. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

वाघमारेची चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
पहिल्याच दिवशी पोलिसांनी वाघमारेची कसून चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या दाव्यांत फोलपणा असल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण घोटाळ्यात वाघमारे याची चौकशी होणे अतिशय महत्त्वाची बाब आहे.

का महत्त्वाचा आहे नीलेश वाघमारे ?
वासुदेव नगर येथील रहिवासी असलेला वाघमारे हा २०१९ ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक) म्हणूून कार्यरत होता. जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. आतापर्यंत ६९० शिक्षकांची नावे समोर आली आहे. त्यांच्या वेतनापोटी शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याची माहिती असूनदेखील वाघमारेने वेतन काढले होते. प्रकरणात नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या उपसंचालक उल्हास नरड यांची तक्रार आणि अहवालाच्या आधारावर वाघमारेचे निलंबन झाले होते.

Web Title: Finally, Nilesh Waghmare, the 'wanted' in the scholarship scam, is arrested.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.