पिता-पुत्राला जबर मारहाण

By Admin | Updated: November 15, 2015 02:17 IST2015-11-15T02:17:58+5:302015-11-15T02:17:58+5:30

फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Father-son riot | पिता-पुत्राला जबर मारहाण

पिता-पुत्राला जबर मारहाण

पाहमीतील घटना : फटाके फोडण्यावरून वाद
भिवापूर : फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहमी (चिचाळा) येथे गुरुवारी रात्री ७.४० वाजताच्या सुमारास घडली.
ताराचंद म्हैसकर (५०), धनंजय ऊर्फ धम्मा ताराचंद म्हैसकर (२९) व समीर ताराचंद म्हैसकर या पिता-पुत्रांचा जखमींमध्ये समावेश असून, ते पाहणी (चिचाळा), ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुधाकर शंकर पिल्लेवान (४७), शीतल सुधाकर पिल्लेवान (२९) रा. पाहमी यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. समीर म्हैसकर हा पुण्याला राहात असल्याने तो दिवाळीनिमित्त गावाला आला. दरम्यान, समीरचे गावातील काही मित्र त्याला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या घरी आले होते. समीर हा त्याच्या मित्रांसह घरासमोर फटाके फोडत होता. सुधाकर पिल्लेवान याचे घर ताराचंद म्हैसकर यांच्या घरासमोर असल्याने फोडलेले फटाके सुधाकर पिल्लेवान याच्या घरासमोर उडाले. त्यातच फटाक्यांच्या आवाजामुळे सुधाकर पिल्लेवान याच्या अंगणात बांधलेल्या गाई बिथरल्या. त्यामुळे ताराचंद व सुधाकर यांच्यात बाचाबाची झाली.
त्यातच सुधाकरचा मुलगा शीतल हा हातात कुऱ्हाड घेऊन म्हैसकर कुटुंबीयांवर धावून आला. त्याने कुऱ्हाडीने वार करून ताराचंद व त्यांची दोन मुले धम्मा व समीरला जखमी केले. परिसरातील नागरिकांनी लगेच धाव घेत शीतलच्या हातची कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि ताराचंद, धम्मा व समीरला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे या तिघांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Father-son riot