महापालिकेत वडील शिपाई, मुलगा नगरसेवक; रेशीमबागेत शिवसेनेचा गुलालात रंगलेला विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:32 IST2026-01-16T19:31:13+5:302026-01-16T19:32:58+5:30
निवडणूक प्रचारादरम्यान गणेश चर्लेवार यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांचे प्रश्न आणि महिला सुरक्षेसारख्या स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. सातत्यपूर्ण जनसंपर्क, साधी जीवनशैली आणि समस्यांबाबतची ठाम भूमिका यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.

महापालिकेत वडील शिपाई, मुलगा नगरसेवक; रेशीमबागेत शिवसेनेचा गुलालात रंगलेला विजय
क्षितिजा देशमुख :
नागपूर : सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत जनतेच्या विश्वासाच्या बळावर राजकारणात आपली ओळख निर्माण करणाऱ्या तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा रेशीमबाग परिसरातून समोर आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३१ मधून शिवसेनेचे उमेदवार गणेश चर्लेवार यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपदावर झेप घेतली.
विजयानंतर रेशीमबाग परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत गुलाल उधळून, घोषणाबाजी करत हा विजय साजरा केला. विशेष बाब म्हणजे गणेश चर्लेवार यांचे वडील नागपूर महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या वडिलांचा मुलगा आज त्याच महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडूनआल्याने हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला.
निवडणूक प्रचारादरम्यान गणेश चर्लेवार यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांचे प्रश्न आणि महिला सुरक्षेसारख्या स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. सातत्यपूर्ण जनसंपर्क, साधी जीवनशैली आणि समस्यांबाबतची ठाम भूमिका यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना गणेश चर्लेवार म्हणाले, “हा विजय माझा वैयक्तिक नसून रेशीमबागमधील प्रत्येक नागरिकाचा आहे. सर्वसामान्य घरातील तरुणालाही संधी दिल्यास तो जबाबदारीने काम करू शकतो, हे मी कृतीतून दाखवणार आहे.” या विजयामुळे रेशीमबाग परिसरात विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.