घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

By नरेश डोंगरे | Updated: December 23, 2024 19:22 IST2024-12-23T19:22:06+5:302024-12-23T19:22:35+5:30

Nagpur Crime News: अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

Family from Chhattisgarh arrested in Nagpur for stealing from landlord as they were not getting their wages | घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

- नरेश डोंगरे 
नागपूर - अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

जीआरपी सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वर (४३), अनिता (३८) आणि त्यांची दोन मुले अभय (१९) आणि अंकित (वय १८) अशी या चाैघांची नावे आहेत. मुळचे छत्तीसगडमधील रहिवासी असलेले अत्यंत गरिब आहे. कामाच्या शोधात चार वर्षांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. तेथे एका जमिनदाराकडे ते काम करीत होते. रात्रंदिवस शेतात राबवून घेणारा जमिनदार त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मात्र देत नव्हता. पैसे मागितल्यास तो त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागविणे दूर, पोटभर खायलाही मिळत नव्हते. त्यामुळे हे बिचारे चांगलेच वैतागले होते. अशात शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्यांनी १९ डिसेंबरला त्याच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि सुमारे २० हजार रोख असा एकूण ४ लाख, ८२ हजारांचा ऐवज चोरला. तो घेऊन ही मंडळी ट्रेन नंबर १२६२५ केरला एक्सप्रेसने छत्तीसगडकडे जाण्यासाठी निघाली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी या चोरीची तक्रार पुदुमंड (जि. निलगिरी, तामिळनाडू) पोलीस ठाण्यात नोंदली गेली. पोलिसांनी चाैकशी केली असता हे चाैघे केरला एक्सप्रेसने नागपूरकडे जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी नागपूर रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. पोलिस निरीक्षक सत्येंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच कारवाईचा पवित्रा घेतला. ही गाडी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफच्या जवानांनी संशयीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचांदीचे हार, कर्णफुल, बिछूवे, बांगड्या, अंगठ्या आणि रोख १९,२६५ रुपये ताब्यात घेतले. ही माहिती तामिळनाडू पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार रविवारी तामिळनाडू पोलिसांचे पथक नागपुरात पोहचले. त्यांनी आरपीएफच्या ताब्यातून उपरोक्त चाैघांना ताब्यात घेतले.
 
गुन्ह्यामागचे कारण जाणून सारेच झाले शांत
धाडसी चोरी करून एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जाणारे आरोपी सराईत असावे, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी चोरीमागची हतबलता, वैताग स्पष्ट करताच तपास करणारी मंडळीही काही वेळेसाठी स्तब्ध झाली.

Web Title: Family from Chhattisgarh arrested in Nagpur for stealing from landlord as they were not getting their wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.