तुम्हीही सावध व्हा! केवळ न्यायाधीशच नव्हे, ‘फाल्कन’च्या जाळ्यात अडकले हजारो गुंतवणूकदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 00:16 IST2025-03-12T00:15:09+5:302025-03-12T00:16:55+5:30

-योगेश पांडे, नागपूर नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांना एका कंपनीने ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. मुळात ...

Falcon invoice discounting fraud racket across the country including Maharashtra, thousands of investors have been cheated | तुम्हीही सावध व्हा! केवळ न्यायाधीशच नव्हे, ‘फाल्कन’च्या जाळ्यात अडकले हजारो गुंतवणूकदार

तुम्हीही सावध व्हा! केवळ न्यायाधीशच नव्हे, ‘फाल्कन’च्या जाळ्यात अडकले हजारो गुंतवणूकदार

-योगेश पांडे, नागपूर
नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांना एका कंपनीने ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. मुळात ‘फाल्कन इन्व्हॉईस डिस्काऊंट’ (एफईडी) या कंपनीने केवळ न्यायाधीशच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना जाळ्यात अडकविले आहे, अशी माहिती पोलिस यंत्रणेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. फसवणुकीचा आकडा हा हजारो कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांना नातेवाइकांच्या माध्यमातून ‘फाल्कन’ची माहिती कळली. त्यांनी चांगला नफा मिळेल, या विश्वासाने गुंतवणूक केली. सुरुवातीला नफा मिळाला, मात्र नंतर कंपनीने साडेतेरा लाखांची फसवणूक केली. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यावर खळबळ उडाली आहे. केवळ न्यायाधीशच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेकांना या कंपनीने जाळ्यात ओढले होते. 

एकालाही पैसे परत मिळाले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, गुजरात, तेलंगणा, केरळ, पंजाब, बिहार, ओडिसा येथील गुंतवणूकदारांनादेखील गंडा घातला आहे. 

बंगळुरू, रोहतक, हैदराबाद, रोहतक, कोईम्बतूर येथील गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, फसवणूक झालेल्यांपैकी एकालाही पैसे परत मिळालेले नाहीत. न्यायाधीशांच्या मुंबईतील उच्चपदस्थ नातेवाइकांकडून पाच वर्षांपासून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती व त्यांचे पैसेदेखील बुडाले आहेत.

व्हेंडर्सच्या इन्व्हॉईसमध्ये गुंतवणुकीचा फंडा

‘फाल्कन’कडून इंटरनेट व सोशल माध्यमांद्वारे गुंतवणूक स्कीमचा प्रचार प्रसार करण्यात आला होता. देशातील मोठ्या कंपन्यांना विविध व्हेंडर्सकडून कच्चा माल तसेच इतर साहित्य पुरविण्यात येते. या व्हेंडर्सच्या इन्व्हॉईसच्या बदल्यात कंपन्यांकडून ३० दिवस, ९० दिवस किंवा १८५ दिवसांनंतर रक्कम अदा केली जाते. या व्हेंडर्सला खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. 

हे व्हेंडर्स आमच्याकडे इन्व्हॉईस वटविण्यासाठी देतात व त्याच्या बदल्यात १४ टक्के ते २२ टक्के रक्कम आम्हाला देतात, असा दावा ‘फाल्कन’कडून करण्यात आला होता. या तथाकथित इन्व्हॉईसची तपासणी करण्याची बतावणी करत त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ते गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जात होते. 

दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉईस फाल्कन इन्व्हॉईस डिस्काऊंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते. सुरुवातीला लहान नफ्याची रक्कम देत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला जात होता.

हजारो गुंतवणूकदार हवालदिल

देशभरातील विविध राज्यांतील हजारो गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये ‘फाल्कन’मध्ये अडकले आहेत. फाल्कनकडून जारी करण्यात आलेला ई-मेल आयडी व हेल्पलाईन क्रमांक डिॲक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ई-मेलदेखील बाउन्स होत आहेत.

Web Title: Falcon invoice discounting fraud racket across the country including Maharashtra, thousands of investors have been cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.