नागपुरात ११.०१ कोटींचा बनावट 'आयटीसी' घोटाळा उघड ! सीजीएसटीने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:55 IST2025-11-01T13:51:53+5:302025-11-01T13:55:11+5:30
Nagpur : सीजीएसटीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, राजवीर एंटरप्रायजेसचे अतुल प्रकाशराव देशमुख यांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा प्रत्यक्षात न घेता बनावट बिलांच्या आधारे ११.०१ कोटींचा फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) लाभ घेतला होता.

Fake 'ITC' scam of Rs 11.01 crore exposed in Nagpur! CGST takes action
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क नागपूर-२ आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेजन शाखेने ११.०१ कोटींच्या बनावट जीएसटी (इनपुट टॅक्स क्रेडिट) घोटाळा उजेडात आणला आहे. विभागाने विकसित केलेल्या अंतर्गत गुप्त माहिती प्रणाली आणि प्रगत डेटा विश्लेषण साधनांच्या मदतीने उघडकीस आणण्यात आला.
सीजीएसटीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, राजवीर एंटरप्रायजेसचे अतुल प्रकाशराव देशमुख यांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा प्रत्यक्षात न घेता बनावट बिलांच्या आधारे ११.०१ कोटींचा फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) लाभ घेतला होता. याशिवाय, त्यांनी कोणत्याही वस्तू अथवा सेवांचा पुरवठा न करता ११.१७कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस जारी केल्या आणि जीएसटीआर-१ दाखल केला होता. तपासादरम्यान अतुल देशमुख यांनी कमिशन घेऊन आणि बेकायदेशीर रकमेचा लाभ घेतल्याची कबुली दिली.
याप्रकरणी देशमुख यांना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली आणि ३१ ऑक्टोबरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीजीएसटी नागपूर-।॥ आयुक्तालयाने करचोरी आणि जीएसटी फसवणुकीविरुद्ध कठोर भूमिका घेऊन अशा प्रकारच्या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.