नागपुरात ६ कोटींच्या बनावट अगरबत्ती जप्त; ब्रॅन्डची नकल करून सुरू होती विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 13:11 IST2022-02-22T13:01:50+5:302022-02-22T13:11:57+5:30
नागपूरमधील बनावट अगरबत्ती बनवणाऱ्या गृह उद्योगाच्या दोन गोदामांवर छापे घालून ६ कोटी रुपये मूल्याच्या बनावट अगरबत्त्या व धूप उत्पादने जप्त करण्यात आली.

नागपुरात ६ कोटींच्या बनावट अगरबत्ती जप्त; ब्रॅन्डची नकल करून सुरू होती विक्री
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बनावट अगरबत्ती बनविणाऱ्या गृह उद्योगाच्या दोन गोदामांवर सोमवारी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यात तब्बल ६ कोटींच्या बनावटी अगरबत्ती व धूप उत्पादने जप्त करण्यात आली. नवी दिल्ली येथील जिल्हा न्यायालयाच्या निर्देशावरून हे छापे घालण्यात आले.
अगरबत्तीचे उत्पादन करणाऱ्या एका नामांकीत कंपनीचे नाव व ब्रॅन्डचा वापर करून बनावट उत्पादनांची विक्री केली जात होती. अनेक राज्यात हा गोरखधंदा सुरू होता. सोमवारी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपुरातील एका गृह उद्योगाच्या गोदामांवर छापा टाकत तब्बल ६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. याआधी गुजरात, कोलकाता, ओडिशा, पटणा येथेही कारवाई करण्यात आली होती. त्याअंतर्गत नागपुरातही ही कारवाई करण्यात आली.
याबाबत एमडीपीएचचे डायरेक्टर अंकित अग्रवाल म्हणाले, भारतात बनावट अगरबत्तीच्या विरोधात आमचा लढा सुरू आहे. हा गेल्या काही काळातील सर्वांत मोठ्या छाप्यांपैकी एक ठरला. उच्च न्यायालयाच्या आदेशावर आम्ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापेमारी केली. आमच्या निष्ठावंत ग्राहकांना केवळ अस्सल उत्पादनेच उपलब्ध व्हावीत आणि हानीकारक ठरू शकणारा बनावट माल विकून त्यांची कुणीही फसवणूक करू नये, याची खात्री करण्याच्या आमच्या मोहिमेचाच हा भाग असल्याचे अग्रवाल म्हणाले.