दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 03:13 PM2022-01-28T15:13:49+5:302022-01-28T15:22:54+5:30

या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे.

Exposing the gang who swindled crores of rupees by showing the lure of double payment | दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांची कोट्यवधींची रोकड हडपलीचंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यालाही गंडा परतवाड्याचा आरोपी जेरबंद

नागपूर : चाळीस हजार दिल्यास काही वेळेतच एक लाख परत करण्याची थाप मारून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील शेख एजाज शेख अहमद (रा. परतवाडा) याला पोलिसांनी अटक केली. मात्र, टोळीचा सूत्रधार पप्पू अवस्थी (वय ५५, रा. जगनाडे चाैक नंदनवन) आणि राजू काल्या ऊर्फ दीपक चाैधरी त्याच्या साथीदारांसह फरार झाला आहे.

विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने दुप्पटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी नागपुरात सक्रिय असल्याचे वृत्त २२ आणि २३ नोव्हेंबर २०२१ ला प्रकाशित करून या टोळीचा खुलासा केला होता.

कुख्यात पप्पू अवस्थी आणि राजू काल्या फायनान्स किंवा इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या तसेच व्यापारी उद्योजकांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) येथील रुक्मिणी वाॅर्डात राहणारे कापड व्यावसायिक जयप्रकाश बिकमचंद पाटणी (वय ४६) यांच्यासोबत डिसेंबर २०२१ ला राजू काल्याची ओळख झाली.

आमच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट (ब्लॅक) नोटा असून काही वेळेतच तुम्हाला चाळीस लाखांच्या बदल्यात एक कोटी रुपये देऊ, अशी बतावणी केली. संशय असेल तर आमच्या नोटा कोणत्याही बँकेत चालवून बघा, असे म्हणत पाचशेंच्या काही नोटाही पाटणी यांना दाखविल्या. त्या असलीच असल्याने संशय घेण्याचे कारण नव्हते. अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर पाटणी यांनी काल्यासोबत डील करण्याचे ठरवले. त्यानुसार, २३ डिसेंबर २०२१ ला पाटनी त्यांच्या एका मित्रासह २ लाखांची रोकड घेऊन नागपुरातील वर्धामाननगरात पोहचले. येथे एमएच ४३- एआर ७३९९ क्रमांकाच्या कारमध्ये काल्या आणि मोहम्मद एजाज पोहोचले. सायंकाळपर्यंत टाईमपास केल्यानंतर पाटनी यांच्याकडून रोकड घेऊन चार लाख रुपये घेण्यासाठी येण्याची तारीख दिली.

दरम्यान, २८ डिसेंबरला दुपारी २ वाजता पाटनी खरेदीच्या निमित्ताने सात लाख रुपये घेऊन नागपुरात आले. यावेळी त्यांनी काल्याशी संपर्क करून आपल्या चार लाखांची मागणी केली. काल्याने सायंकाळी ६ वाजता देशपांडे लेआउटमधील इंडियन ओव्हरसिज बँकेजवळच्या पुलाखाली बोलविले. तेथे काल्या, एजाज आणि अवस्थी त्यांच्या मर्सिडिज बेंझ कार (एमएच ४३ - एआर ७३९९) ने पोहोचले. त्यांनी पाटनी आणि त्यांच्या मित्राला चार लाख देण्याऐवजी त्यांच्या जवळची सात लाखांची रोकड हिसकावून घेतली.

यावेळी आरोपींसोबत वाद सुरू असतानाच तेथे पोलिसांसारखे दिसणारे वाहन घेऊन काहीजण आले. त्यांनी कशाचा वाद आहे, असे म्हणत काल्याला ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसविले. पोलीस कारवाईच्या शंकेने पाटनी तेथून त्यांच्या मित्रासोबत निघून गेले. काही दिवसांनंतर त्यांनी पप्पू आणि काल्याशी संपर्क केला असता त्याने पोलीस कारवाई झाली रक्कम विसरून जा, असे म्हणत पाटनींची बोळवण केली.

तक्रार मिळताच पोलीस ॲक्शन मोडवर

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटनी यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीने पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांची भेट घेतली. त्यांची तक्रार ऐकून घेताच उपायुक्त हसन यांनी लगेच आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी एजाजला अटक केली. सूत्रधार काल्या आणि पप्पू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या मदतीनेच फसवणूक ?

आरोपी राजू काल्या आणि पप्पू अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा चालवत आहेत. त्यांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यासोबत खास बातचित आहे. त्यामुळे या टोळीवर कारवाईच होत नाही. झाली तरी हे कर्मचारी ‘साहेबांचे’ नाव घेऊन त्या कारवाईचे स्वरूप मवाळ करतात. या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा एकदा आता ही चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Web Title: Exposing the gang who swindled crores of rupees by showing the lure of double payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.