धर्मांतरण केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 21:32 IST2022-10-21T21:30:22+5:302022-10-21T21:32:04+5:30
Nagpur News धर्मपरिवर्तन केल्यानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे.

धर्मांतरण केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार
नागपूर : धर्मांतर करून ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मिळणारे आरक्षण संविधान संमत नाही. धर्मपरिवर्तन केल्यानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. विहिंपचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी या संदर्भात पत्रपरिषदेत भाष्य केले.
ख्रिश्चन व मुस्लिमांनी १९३६ मध्ये आरक्षणाची मागणी केली होती, परंतु महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. गेल्या काही वर्षांत असे आढळून आले आहे की, अनेक लोक धर्मांतर केल्यानंतरही पूर्वीचे नाम, उपनाम कायम ठेवून अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेताना दिसतात. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परांडे यांनी दिला.
काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटले होते की, “भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेत अर्जुनाला जिहाद शिकविला होता.” हिंदू चिंतनात जिहादच्या संकल्पनेला स्थान नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोग शिकविला आहे. भगवत गीता हा ग्रंथ इस्लामच्या उदयापूर्वीचा आहे. त्यामुळे गीतेत जिहाद सांगितला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवराज पाटील यांनी प्रसिद्धी, तुष्टीकरण आणि समाजात भ्रम निर्माण करण्यासाठी असे विधान केले असावे, असा टोलाही परांडे यांनी लगावला.