निकाल लागून ६२ दिवस होऊनही अकरावी प्रवेशाची बोंबच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 20:22 IST2025-07-14T20:21:39+5:302025-07-14T20:22:13+5:30
केंद्रीय पद्धतीच्या ऑनलाइन प्रक्रियेने प्रवेशाचा खोळंबा : पालकांची वाढली धाकधूक

Even after 62 days of results, the 11th admissions are still a bombshell!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी बोर्डाचा निकाल दि. १३ मे रोजी लागला. पण, निकाल लागून दोन महिने लोटल्यानंतरही हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले नाहीत. त्यामुळे अर्ज चुकला असेल का, प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेने विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही धाकधूक वाढली आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली होती. सराव नोंदणीनंतर दि. २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खोळंबली.
पुढे दि. २६ मेपासून पुन्हा नोंदणी सुरू करण्यात आली. दि. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. दि. ११ व दि. १२ जूनला महाविद्यालयीन कोटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. २६ जूनला यादी जाहीर होणार होती व २७ पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्यानुसार २६ तारखेला दिवसभर ऑनलाइन पडताळणी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेशप्रक्रिया पुन्हा रेंगाळली. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले. त्यानंतर दि. २८ जूनला यादी जाहीर करून दि. ३० जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
कॉलेज सुरू होण्याच्या काळात प्रवेश नाही
ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विरोध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विरोधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील कॉलेजमध्ये सुरू असलेले ऑनलाइन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भोगावा लागतो आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू होणार होती. मात्र, यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.
तर विद्यार्थी राहणार बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित
मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना बार्टीची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. दि. १ जुलैपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बार्टीला अर्ज करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्याचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडावे लागते. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नसल्याने त्यांना बोनाफाइड मिळाले नाही, ज्यामुळे बार्टीचे अर्जही करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
जेमतेम पहिली फेरी पूर्ण, २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
दि. ३० जून ७ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. यादरम्यान नोंदणी केलेल्या २२,५७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण ९७,४३५ जागा आहेत, त्यासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र खरी चिंता विज्ञान शाखेत प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या ४९ हजार जागा आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत १३ हजार प्रवेश झाले आहेत. मात्र ८५ ते २० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे पुढे काय होईल, ही चिंता पालकांना आहे.