वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल
By आनंद डेकाटे | Updated: October 30, 2023 18:18 IST2023-10-30T18:17:23+5:302023-10-30T18:18:23+5:30
बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल
नागपूर : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना लक्ष्मीनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रिष्णा अशोक डकाहा या ग्राहकाने मागील तीन महिन्यांपासून विजेचे बील भरले नाही, त्यांच्याकडील १०,४५० रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी शेख इसुफ़ शेख रहमान हे निशा तरेकर आणि हरिष तराळे या सहकाऱ्यांसमवेत गेले असता तेथे आकाश क्रिष्णा डकाहा हा इसम आला, त्यास थकबाकीबद्दल विचारले असता त्याने थांबा पैसे घेऊन येतो म्हणुन सांगितले.
अर्धा तास होऊन देखिल तो काही प्रतिसाद देत नाही हे बघून पैसे द्या अन्यथा वीजपुरवठा खंडित करु असे सांगत शेख इसुफ़ शेख रहमान वीजपुरवठा खंडित करण्यास खुर्चीवर चढले तेव्हा आकाश याने त्यांना मागून ओढून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला या कारणास्तव शेख इसुफ़ शेख रहमान यांनी आकाश क्रिष्णा डकाहा याच्या विरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.