प्रेमाच्या नाट्यात आठ पती, लुटेरी दुल्हनने उडवले दोन कोटी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:27 IST2025-08-01T13:26:29+5:302025-08-01T13:27:06+5:30
Nagpur : डॉलीच्या टपरीवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Eight husbands in a love drama, a robber bride blew two crores!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, श्रीमंत विवाहित पुरुषांकडून तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल करणाऱ्या 'समीरा' या लुटेरी दुल्हनला अखेर गिट्टीखदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शादी डॉट कॉमसारख्या मॅट्रिमोनियल साइट्सचा वापर करत समीरा हनी ट्रॅप रचत होती. एकटीने आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर अखेर सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डॉलीच्या टपरीवरून तिला अटक झाली. वकील फातिमा पठाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नागपूर शहरात खळबळ उडवणान्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
समीरा फातिमा ऊर्फ लुटेरी दुल्हन या संशयित महिलेच्या गिट्टीखदान पोलिस मागील दीड वर्षापासून मागावर होते. मात्र, ती फरार होती. सोशल मीडियावर 'घटस्फोटित' असल्याचे भासवत श्रीमंत पुरुषांशी जवळीक साधून, त्यांच्याशी विवाह करीत ती फसवणूक करायची. आतापर्यंत तिने तब्बल ८ जणांशी लग्न करून कोट्यवर्षीचा गंडा घातला आहे. तिच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये भिवंडीचे हँडलूम व्यावसायिक इमरान अन्सारी, मोमिनपुराचे शिक्षक नजमुज साकीब, रहेमान शेख, परभणीतील शिक्षण संस्थेचे मिर्झा अशरफ बेग, कंपनी मॅनेजर मुदस्सीर मोमीन, बैंक मॅनेजर मोहम्मद तारिक अनिस, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अमानुल्लाह खान आणि रिअल इस्टेट व्यावसायिक गुलाम गौस पठाण यांचा समावेश आहे. लग्नानंतर काही काळ संसार थाटल्यानंतर, समीरा या पुरुषांना पोलिस कारवाईची धमकी देत सेटलमेंटसाठी दबाव आणायची. तिच्या या पद्धतीच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी पोलिस आणि न्यायालयात धाव घेतल्यावर तिचे कारनामे उघड झाले. पत्रकार परिषदेला मुदस्सीर मोमीन, मोहम्मद तारिक अनिस आणि गुलाम गौस पठाण हेही उपस्थित होते.
मोहजालात लुटले गेले सातजण
लुटेरी दुल्हन समीरा फातिमा हिच्या प्रेमा'च्या नाटकाने सातजण अक्षरशः गंडवले गेले. या मोहजालात अडकलेल्या प्रत्येकाकडून समीराने कुणाकडून रक्कम, तर कुणाकडून मालमत्ता अशा पद्धतीने भरघोस लूट केली. भिवंडीचे इमरान अन्सारी यांच्याकडून घेतलेली रक्कम फार मोठी असल्याची माहिती आहे.
मोमीनपुरा येथील नजमुज साकीबकडून तर चक्क ४० लाख रुपये आणि एक फ्लॅट घेतला. परभणीच्या मिर्झा अशरफ वेगकडून दरमहा ३० हजार रुपये घेतले जात होते. कंपनी मॅनेजर मुदस्सीर मोमीन यांच्याकडून ५ लाख रुपये घेऊन एफआयआर मागे घ्यायला लावला. बँकेतील मॅनेजर मोहम्मद तारिक अनिसकडून ५० लाख, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अमानुल्लाह खानकडून १२.५० लाख, तर रिअल इस्टेट व्यावसायिक गुलाम गौस पठाणकडूनही ५० लाख रुपये उकळले गेले. अॅड. फातिमा पठाण यांच्या माहितीनुसार, एकट्या समीराच्या बँक खात्यात थेट १ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय काहींनी तिला दागिने, रोख रक्कम आणि फ्लॅट स्वरूपातही भरघोस संपत्ती दिली आहे. पोलिस तपास सुरू असून, प्रत्यक्ष फसवणुकीचा एकूण आकडा किती आहे. याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.