रेल्वे स्टेशनवर इकोनॉमी मील वेंडिंग ! प्रवाशांना खाद्यान्न आणि पाणी मिळणार कमीत कमी पैशात
By नरेश डोंगरे | Updated: March 29, 2025 17:23 IST2025-03-29T17:20:57+5:302025-03-29T17:23:30+5:30
उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी : मध्य रेल्वेकडून सुविधा

Economy meal vending at railway station! Passengers will get food and water at minimum cost
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये उन्हाळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन मध्य रेल्वेचे नागपूर विभागाने प्रवाशांसाठी खाद्यान्न आणि पिण्याचे पाणी कमीत कमी पैशात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर 'इकॉनोमी मिल वेडिंगची ची व्यवस्था करण्यात आली आहे
इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. उन्हामुळे वारंवार भूक तहान लागत असल्याने आणि महागडे पदार्थ घेऊन खाण्यापिण्याची हौस भागविण्यासाठी सर्वांचीच आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे अनेक प्रवासी अर्धपोटी प्रवास करतात. त्यामुळे नंतर त्यांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत.
रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांना रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानकावर चांगल्या प्रतीचे खाद्य पदार्थ तसेच पिण्याचे पाणी आणि शीतपेय उपलब्ध करून द्यावी, यासाठी वेंडर्स ना स्टॉल धारकांना खास निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची शीतपेयांची आणि चहा कॉफी सह पिण्याच्या पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी रेल्वेने दररोज ठिकठिकाणीचे व्हेंडर्स तसेच स्टॉलच्या तपासण्या चालविल्या आहेत. विविध ठिकाणाच्या रेल्वे केटरिंग देणाऱ्या २५ हून अधिक ठिकाणचे खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने संकलित केले आहेत. हे सर्व नमुने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या नियमानुसार तपासले जात आहेत.
प्रवाशांना योग्य दरात खाद्य आणि पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्व केटरिंग स्टॉल चालकांना १-लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे मूल्य १५ रुपयांपेक्षा जास्त घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, नागपूर रेल्वे स्थानकावर सर्वसामान्य प्रवाशांसाठी स्वस्त जेवण उपलब्ध करण्यासाठी इकोनॉमी मील वेंडिंग सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थांसोबत बोलणी
मोफत पिण्याच्या पाण्याची सेवा पुरवण्यासाठी, नागपूर विभागाने स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था, संघटना यांच्यासोबत सेवा संपर्क करून प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
चार स्थानकांवर सेवा सुरू
पांढुर्णा, वणी, धामणगाव आणि आमला रेल्वे स्थानकांवर यशस्वीपणे राबवण्यात आली आहे, येथे स्वयंसेवी संस्था गरजूंना ही सेवा देत आहे.
स्टॉल धारकांना निर्देश प्रवाशांना आवाहन
खाण्यापिण्याच्या पदार्थाबाबत कसली तडजोड होऊ नये यासाठी विभागातील प्रमुख स्थानकांवर केटरिंग सेवा देणाऱ्या परवानाधारकांशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विक्रेत्यांना स्वच्छता नियमांचे पालन करण्यास आणि प्रवाशांसाठी उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी बजावण्यात आले आहे. याउपर खाण्यापिण्याच्या संबंधाने कोणतीही तक्रार करायची असेल तर रेल्वे अधिकाऱ्यांकडे किंवा हेल्पलाईन नंबर वर नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.