कोरोनामुळे सराफा व्यवसायात आर्थिक टंचाई; दहा हजार कारागीर संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:51 IST2021-06-02T10:51:22+5:302021-06-02T10:51:50+5:30
Nagpur News गेल्यावर्षी ७ ते ८ हजार कोटींच्या तुलनेत यंदा सव्वा दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १० हजार कोटींचा व्यवसाय प्रभावित झाला आहे.

कोरोनामुळे सराफा व्यवसायात आर्थिक टंचाई; दहा हजार कारागीर संकटात
मोरेश्वर मानापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लहानमोठ्या सराफा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नुकसान जास्त झाले आहे. याशिवाय बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना हप्ते न फेडल्याने नोटसा येत आहेत. गेल्यावर्षी ७ ते ८ हजार कोटींच्या तुलनेत यंदा सव्वा दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १० हजार कोटींचा व्यवसाय प्रभावित झाला आहे. वेळेच्या निर्बंधानुसार दुकाने सुरू झाली असली तरीही व्यवसाय सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत.
नागपुरातील मोठे सराफा व्यावसायिक राजेश रोकडे म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील दुकाने सुरू होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करता आली. पण यंदा जिल्हा बंदी व संपूर्ण लॉकडाऊनमुळे खरेदी करता आली नाही. राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा वेळेवर केल्याने दुसऱ्या दिवशीपासून दुकाने बंद झाली. त्यामुळे मोठ्या ग्राहकांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात खरेदी केली. त्याचा फटका नागपुरातील सराफांना बसला. गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि अन्य सण व्यवसायाविना गेले.
दहा हजार कारागीर संकटात
नागपूर जिल्ह्यात जवळपास ९ ते १० हजार कारागीर आहेत. त्यात ७० टक्के पश्चिम बंगालचे आहेत. त्यापैकी ९० टक्के कारागीर मूळ गावी परतले. कारागिरांअभावी अनेक कामे थांबली आहेत. काम नसल्याने ते परतण्यास तयार नाहीत. दसऱ्यापूर्वी परतण्याची अपेक्षा आहे.
- तर चुकीचा मार्ग पत्करतील सराफा
१ जूनपासून दुकाने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून केली होती. दुकाने सुरू न झाल्यास सराफा व्यावसायिक चुकीच्या मार्गाने व्यवसाय करतील, असे पत्रात म्हटले होते. ग्राहक दुपार व सायंकाळी खरेदीसाठी येतात. पण वेळेच्या बंधनामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. काहीही असो दुकाने सुरू झालीत हे महत्त्वाचे आहे.
भविष्यात ऑनलाईनची चलन वाढणार,
नाणे व सुट्या सोन्याची खरेदी वाढली
भविष्यात सराफा व्यावसायिकांना ऑनलाईन खरेदी-विक्रीची जोड मिळाली आहे. ऑनलाईन दागिन्यांची निवड करून घरपोच डिलिव्हरी देण्यात येत आहे. ग्राहकांनाही ही योजना पसंतीस येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सराफांनी २५ टक्के व्यवसाय केल्याचे पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. रोकडे म्हणाले, कोरोनामुळे लोकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला जास्त प्राधान्य दिले. नाणे आणि एक ते पाच ग्रॅमपर्यंत सोने खरेदी केली. भविष्यातील गुंतवणूक म्हणून सोने खरेदी वाढणार आहे. याशिवाय लोकांनी महिनेवारी खरेदी वाढविली आहे.