नागपूरमध्ये होतोय आता ई-चालान स्कॅम ! नागरिकांची फसवणूक करणारे व्हॉट्सअॅप मेसेज
By शुभांगी काळमेघ | Updated: June 9, 2025 19:27 IST2025-06-09T19:25:02+5:302025-06-09T19:27:07+5:30
Nagpur : नागपूर सायबर पोलिसांनी या घोटाळ्याच्या तपासासाठी पाऊले उचलली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

E-challan scam is happening in Nagpur! WhatsApp messages defrauding citizens
शुभांगी काळमेघ
नागपूर : नागपूरमध्ये आता सायबर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना फसवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर बनावट ई-चलन मेसेज पाठवले जात आहेत. नागपूर सायबर पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सायबर भामटे व्हॉट्सअॅपवर अज्ञात क्रमांकातून मेसेज पाठवतात. हा मेसेज परिवहन सेवा किंवा वाहतूक पोलिसांच्या नावाने बनावट ई-चलन असल्याचे सांगतो. त्यात वाहन क्रमांक, उल्लंघनाची माहिती आणि पेमेंट लिंक असते. परंतु, या लिंकवर क्लिक केल्यास एक APK (Android Package Kit) फाइल डाउनलोड होते, जी एक मालवेअर असते.
हा मालवेअर वापरकर्त्याच्या फोनमध्ये प्रवेश मिळवतो आणि संपर्क, संदेश, कॉल्स यासह SMS फंक्शनलिटीवर नियंत्रण मिळवतो. त्यानंतर, OTPs आणि इतर संवेदनशील माहिती Telegram चॅनेलवर पाठवली जाते. यामुळे बँकिंग अॅप्समध्ये प्रवेश मिळवून अनधिकृत व्यवहार होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
- अधिकृत लिंक वापरा: ई-चलन तपासण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट (https://echallan.parivahan.gov.in) वापरा.
- APK फाइल्स टाळा: व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेल्या APK फाइल्स डाउनलोड करू नका.
- अॅप परवानग्या तपासा: अॅप्सच्या परवानग्या तपासा आणि अनावश्यक परवानग्या रद्द करा.
- अँटीव्हायरस वापरा: विश्वसनीय अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि नियमितपणे अपडेट करा.
- संदिग्ध मेसेजेसची माहिती द्या: सायबर पोलिसांना (https://cybercrime.gov.in) किंवा स्थानिक पोलिस स्थानकाला माहिती द्या