नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:31 IST2024-12-13T17:29:07+5:302024-12-13T17:31:24+5:30

संबंधित विभाग म्हणतात, पाहू, बघू, करू : निव्वळ चालढकल सुरू

Dust everywhere due to construction in Nagpur, pollution measures ignored | नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष

Dust everywhere due to construction in Nagpur, pollution measures ignored

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
एकाच भागात वारंवार मोठमोठे बांधकाम होत असल्यास त्या भागात वायू प्रदूषणात प्रचंड वाढ होते. ही परिस्थिती सध्या धंतोली आणि रामदासपेठेतील नागरिक अनुभवत आहेत. धुळीचे लोट रस्त्यावर पसरले आहेत. परिसरात पार्क केलेल्या वाहनांवर साचलेल्या मातीच्या थरावरून लक्षात येते की, किती मोठ्या प्रमाणात वातावरणात धुळीचे कण पसरले आहेत. प्रदूषण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. पण या यंत्रणांना प्रदूषणाची फारशी गंभीरता नसल्याचे दिसून येत आहे.


केंद्र सरकारचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय असून, बांधकाम तसेच पाडकामातून निर्माण होणारा कचरा तसेच घनकचरा यांच्या पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. या तरतुदीनुसार बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करणे व करवून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक स्वराज्य संस्थांना उपाययोजना करायच्या आहेत. नागपूर शहरामध्ये मोठ्या इमारतींच्या बांधकामाला महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मंजुरी मिळत असल्याने आणि महापालिकेत पर्यावरण विभाग असल्याने नवीन बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना नगररचना व पर्यावरण विभागाकडून करायच्या आहेत. 


प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी करायच्या उपाययोजना 
धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुके विरोधी गनचा वापर, हिरवे आच्छादन, बांधकाम साईटच्या भोवताली उच्च-उंचीचे अडथळे आणि नियमितपणे पाणी शिंपडणे. पाण्याचे फवारे आणि विंडब्रेक वापरणे यासारखे अनेक उपाय आवश्यक आहेत. बांधकाम साईटवर त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, साईट व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते, महापालिकेची जबाबदारी 
'लोकमत'ने रामदासपेठ, धंतोलीचा धुळीमुळे गुदमरतो श्वास या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. हे प्रदूषण कोण नियंत्रणात आणणार यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी महापालिकेच्या नगररचना व पर्यावरण विभागाची आहे. नगररचना विभागाकडे काय उपाययोजना करणार, अशी विचारणा केली असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की, साईटवर जाऊन काय उपाययोजना करता येईल ते पाहू


"महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे बांधकाम तसेच पाडकामामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिकाऱ्यांसाठी 'वायू प्रदूषण उपशमनासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बांधकाम आणि पाडकाम उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, प्राधिकरणाने पर्यावरण कायद्याच्या अनुषंगाने उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही." 
-नफीस शेख, पर्यावरण रिसर्च अँड ॲनालेसिस फाउंडेशन

Web Title: Dust everywhere due to construction in Nagpur, pollution measures ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.