दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह; ३०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा, व्यापारी सज्ज

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 23, 2023 02:00 PM2023-10-23T14:00:02+5:302023-10-23T14:01:37+5:30

सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता यावर्षी दसऱ्याला जवळपास ३०० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Dussehra shopping spree in all markets; 300 crore turnover expected Traders are ready | दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह; ३०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा, व्यापारी सज्ज

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह; ३०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा, व्यापारी सज्ज

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी ‘दसरा’ एक सण. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तसे बजेटही पूर्वीपासून असते. दसरा सणात सर्वाधिक उत्साह ऑटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून येतो. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केले आहे. दसऱ्याला गाडी घरी नेणार आहेत. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दीची अपेक्षा आहे. फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता यावर्षी दसऱ्याला जवळपास ३०० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कार, दुचाकीची विक्री होणार
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वाहने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त उत्तम आहे. अन्य दिवशी खरेदी करण्याऐवजी दसऱ्याला खरेदीकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे बहुतांश ग्राहकांनी कार वा दुचाकीचे पूर्वीच बुकिंग केले आहे. विविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ३० टक्के वाहनांची विक्री दसऱ्याला होणार आहे. त्यात मारुती व ह्युंडई कंपनीचा सर्वाधिक वाटा राहील. दसऱ्याला दीड हजार कारची विक्री होण्याची अपेक्षा आहे. देशातील १६ कार उत्पादकांचे नागपुरात शोरूम आहेत. याशिवाय दुचाकीच्या विक्रीत नागपूर मागे नाही. होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा, बुलेट, महिन्द्र या कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दुचाकीचे आगाऊ बुकिंग केले आहे. जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त दुचाकी विक्रीचा संचालकांचा अंदाज आहे. दसऱ्याला चारचाकी आणि दुचाकी बाजारपेठांमध्ये जवळपास १७० कोटींची उलाढाल होणार आहे.

दसऱ्याला सोने-चांदी खरेदीची परंपरा
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येकजण किमान एक ग्रॅम सोने विकत घेतो. सोन्याचा वाढता दर पाहता यावर्षी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा सराफांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ग्राहकांची आवड लक्षात घेता अनेक लहानमोठ्या शोरूमने एका ग्रॅमपासून दागिने प्रदर्शित केले आहेत. जास्त वजनाचे दागिने खरेदी करण्यासाठी अनेकांनी आधीच आर्डर दिली आहे. त्या दिवशी दागिने घरी नेतील. यादिवशी चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मोठी मागणी असते. या बाजारात १०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा आहे.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी
गेल्या काही वर्षांत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यात मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन आदींचा समावेश आहे. अनेकांनी पूर्वीच शोरूमला भेट देऊन उपकरणाचे बुकिंग केले असून दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी नेणार आहे. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली आहे. याशिवाय दसऱ्याला लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या खरेदीसाठी उपलब्ध योजनांचे पोस्टर शोरूममध्ये लावले आहे. उपकरणांच्या विक्रीचा आकडा निश्चित सांगणे कठीण असले तरीही यावर्षी ५० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची अपेक्षा शोरूमच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. ब्रॅण्डेड उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रॉपर्टी बाजारात उत्साह
नागपुरात प्रॉपर्टीच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक बिल्डर्स व विकासकांनी आकर्षक योजना दाखल केल्या आहेत. रेराअंतर्गत जवळपास ३५० प्रकल्प नोंदणीकृत असून त्यामध्ये १२ हजारांपेक्षा जास्त घरकुल उपलब्ध आहेत. बँकांच्या कमी व्याजदराच्या कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदी सुलभ झाली आहे. विविध योजनांमुळे गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत दसऱ्याला सर्वाधिक फ्लॅटची विक्री होणार असल्याचे बिल्डर्सने सांगितले.

Web Title: Dussehra shopping spree in all markets; 300 crore turnover expected Traders are ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.