नागपूर जिल्ह्यातील नगर पंचायत-परिषद निवडणूक मतदानावर ‘ड्रोन’ने वॉच, पोलिसांचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त
By योगेश पांडे | Updated: December 1, 2025 23:02 IST2025-12-01T23:02:04+5:302025-12-01T23:02:04+5:30
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील नगर पंचायत-परिषद निवडणूक मतदानावर ‘ड्रोन’ने वॉच, पोलिसांचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर ग्रामीण जिल्हयातील नगर पंचायत व नगर परिषद निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे ड्रोन पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे.
सावनेर, कळमेश्वर, मोहपा, खापा, काटोल, नरखेड, कन्हान पिपरी, उमरेड, रामटेक, बोरी अशा एकूण ११ नगरपरिषद तसेच मोवाड़, कोंढाळी, कांद्री, मौदा, भिवापूर, पारशिवनी अशा एकुण ५ नगरपंचायतींअंतर्गत मतदान प्रक्रिया होणार आहे.
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह १८ पोलीस निरीक्षक, ९६ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार १७४ पोलीस अंमलदार, ७०० होमगार्ड्स, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, दोन दंगा नियंत्रण पथके, दोन क्यूआरटी पथक व सहा अतिरिक्त पथके नेमण्यात आली आहेत.
संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष
मतदान केंद्र, स्ट्रॉंग रूम्स येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
७७ गुन्हेगार तडीपार
महिन्याभरात पोलिसांनी ७७ गुन्हेगारांना तडीपार केले तर सहा जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. तीन टोळ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई झाली आहे. १८७ जणांविरोधात अवैध दारूविक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय २३२ गुन्हेगारांवर कलम १२६ तर ४०९ जणांविरोधात कलम १२९ अंतर्गत कारवाई झाली आहे.
सीमेवरदेखील बंदोबस्त
आंतरराज्यीय सीमेवरदेखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून बॅरिकेड्ससह नाकाबंदी केली आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी हॉटेल्स, लॉज, धाबे व फार्म हाऊसेसचीदेखील तपासणी केली आहे.
नागपुरातील पोलीसदेखील तैनात
दरम्यान, निवडणूकीचा काही भाग नागपूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गतदेखील येतो. त्यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांसोबतच अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.