थरार! चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 17:24 IST2021-12-19T14:25:23+5:302021-12-19T17:24:47+5:30
पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली.

थरार! चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली
नागपूर : कार रिव्हर्स घेताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार जोरदार वेगाने रिव्हर्समध्ये येत दोन तरुणांच्या अंगावरून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही घटना सावनेर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर घडली असून कारचालकाच्या एका चुकीमुळे दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले. मेन रोडच्या जवळ पांढऱ्या रंगाची ही कार पार्क करण्यात आली होती. ती काढण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला व क्षणार्धात कार जोरदार वेगाने मागे आली.
यावेळी, बाजुलाच असलेल्या एका बाकडयावर तीन तरुण बसले होते. अचानक कार रिव्हर्समध्ये वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून एक तरुण लगेच उठला तर, इतर दोघांना काही कळण्याआधीच कार त्यांच्या अंगावरून गेली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, कारचालक हा दारूच्या नशेत तुल असल्याने त्याच्याकडून हे कृत्य झाल्याचे म्हटले जात आहे. तर, अचानक झालेल्या या प्रकाराने एकच गोंधळ माजला. दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.